Join us  

टीम इंडियात एक गोष्ट सगळ्यात भारी; त्यामुळेच पक्की वर्ल्ड कप दावेदारी; द्रविडचं लॉजिक

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाटा खेळपट्टी तयार करण्यात येणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 4:29 PM

Open in App

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाटा खेळपट्टी तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे गोलंदाजांना कमी, तर फलंदाजांनाच जास्त फायदा मिळणार आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सध्या सुरू असलेल्या वन डे मालिकेत त्याची प्रचिती येत आहेच. 300+, 350+ अशा धावा होत आहेत आणि त्यांचा यशस्वी पाठलागही केला जात आहे. त्यामुळे सर्वच संघ तगडे फलंदाज घेऊन मैदानावर उतरतील. त्याला भारतीय संघ अपवाद नक्कीच नसेल, परंतु इतरांपेक्षा भारतीय संघ एक पाऊल पुढे राहणार आहे. कारण, इतर संघांच्या तुलनेत भारताकडे विकेट घेणारे गोलंदाज आहेत आणि हीच भारतीय संघाची ताकद आहे. त्यामुळेच जेतेपदाच्या दावेदारांच्या शर्यतीत भारतीय संघ आघाडीवर आहे, असे मत भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.

कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा पहिलाच वर्ल्ड कप आहे आणि जेतेपदाचा चषक घेऊनच मायदेशी परतण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे. भारताप्रमाणे जेतेपदाच्या शर्यतीत इंग्लंड व ऑस्ट्रेलिया हेही आघाडीवर आहेत. सध्याच्या घडीला भारतीय संघाकडे जगातील सर्वोत्तम आघाडीचे फलंदाज आहेत. शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे त्रिकुट अगदी सहजतेने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई करू शकतात. अशा परिस्थिती भारतीय गोलंदाजांवरील जबाबदारीही वाढणार आहे. त्यांना प्रतिस्पर्धी संघाला झटपट गुंडाळण्यासाठी प्रयत्नशील रहावे लागेल, असे द्रविड म्हणाला. 

''गतवर्षी भारत A संघ येथे दौऱ्यावर आला होता आणि त्यावेळी मोठ्या धावसंख्या उभारल्या गेल्या होत्या. वर्ल्ड कपमध्येही धावांचा पाऊस पडेल. अशा परिस्थितील गोलंदाजांनी मधल्या षटकांत विकेट घेत राहणे महत्त्वाचे आहे. आपल्याकडे सक्षम गोलंदाज आहेत, त्यासाठी स्वतःला नशीबवान समजले पाहिजे. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल... हे गोलंदाज आपल्याला विकेट मिळवून देत राहणार. मधल्या षटकांत प्रतिस्पर्धी संघाला धक्के देण्यात यशस्वी होणाऱ्या संघाला विजयाची संधी अधिक असणार आहे,''असे द्रविडने सांगितले.

आयसीसीच्या जागतिक वन डे क्रमवारीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांना नमवण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे इंग्लंडमध्येही भारतीय संघाचाच बोलबाला राहिल, असे द्रविडला वाटते. 

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९राहूल द्रविडविराट कोहलीजसप्रित बुमराहकुलदीप यादवयुजवेंद्र चहल