Join us
Daily Top 2Weekly Top 5

ICC World Cup 2019 : पाच तासांच्या प्रतिक्षेनंतर पाकिस्तान-श्रीलंका सामना रद्द

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर हौसले बुलंद झालेल्या पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्या सामन्यात केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2019 20:28 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर हौसले बुलंद झालेल्या पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्या सामन्यात केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका असा सामना शुक्रवारी होणार होता, परंतु पावसाच्या दमदार खेळीनं सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास पाच तासांच्या प्रतिक्षेनंतर पंचांनी हा सामना रद्द झाल्याचे जाहीर केले.यजमान इंग्लंडला नमवून विजयाची चव चाखणारा पाकिस्तान श्रीलंकेविरुद्ध विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी उत्सुक होता. वेस्ट इंडिजकडून सलामीला पराभूत झालेल्या पाकने दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा 14 धावांनी पराभव केला होता. इंग्लंडविरुद्ध पाककडून फलंदाजीत मोहम्मद हाफिज, बाबर आझम आणि सर्फराज अहमद यांनी चमक दाखविली तर गोलंदाजीत वहाब रियाज, मोहम्मद आमीर आणि शादाब खान यांनी भेदक मारा केला होता.  

न्यूझीलंडकडून लंकेला दहा गड्यांनी पराभवाचे तोंड पहावे लागले. पावसाच्या व्यत्ययातील दुसऱ्या सामन्यात मात्र लंकेने अफगाणिस्तावर विजय साजरा केला होता. लंकेला पाकविरुद्ध मधल्या फळीचे अपयश टाळावे लागेल. या संघाने न्यूझीलंडविरुद्ध अर्धा संघ 14 धावांत गमावला होता. अफगाणिस्तानविरुद्ध त्यांनी 36 धावांत सात फलंदाज गामवले होते. 

दोन्ही संघांदरम्यान आतापर्यंत 154 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले असून त्यापैकी पाकिस्तानने 90, तर श्रीलंकेने 58 सामने जिंकले असून 1 सामना टाय झाला आहे. याशिवाय 5 सामने अनिर्णित राहिले आहेत.

दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतीमधील सर्व सामने पाकिस्तानने जिंकले आहेत. दोन्ही संघांदरम्यान विश्वचषकामध्ये 1975 पासून आतापर्यंत सात सामने झाले असून त्या सर्व सामन्यांमध्ये पाकिस्तानने विजय मिळविलेला आहे.

पाकिस्तान आणि श्रीलंकाने आतापर्यंत प्रत्येकी एक वेळा विश्वचषक जिंकला आहे. विश्वचषकामध्ये पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध 338 तर श्रीलंकेने पाकिस्तानविरूद्ध 288 धावा अशी सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019पाकिस्तानश्रीलंका