लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील स्वतःचे आव्हान स्वकर्मानेच संपुष्टात आणण्याच्या दिशेनं वाटचाल केली आहे. अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशविरुद्ध त्यांना मोठ्या फरकाने विजय मिळवणे आवश्यक होते, परंतु त्यांना पहिल्या दहा षटकांत जेमतेम 38 धावा करता आल्या. शिवाय त्यांचा सलामीवीर फाखर जमान ( 13) आठव्याच षटकात माघारी परतला. त्यामुळे त्यांच्या खेळ असाच कासवगतीनं सुरू राहिल्यास स्पर्धेबाहेर जाण्यापासून त्यांना देवही वाचवू शकत नाही.
आजच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा होता आणि तो
पाकिस्तानच्या बाजूनं लागल्यानं चाहत्यांच्या आशाही उंचावल्या होत्या. पण, त्यांना अपेक्षांवर खरं उतरता आले नाही. या सामन्यात 500 धावा करण्याचा दावा कर्णधार सर्फराज अहमदने केला होता, पण त्यांचा खेळ पाहून ते शक्य असल्याचे दिसत नाही. पाकिस्तानने
बांगलादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली तर त्यांना 50 षटकांत किमान 350 धावा कराव्या लागतील. तसेच 350 धावा केल्यानंतर बांगलादेशला 39 धावांत गुंडाळावे लागेल. म्हणजेच 311 धावांनी विजय मिळवला लागेल.
दुसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना 50 षटकांमध्ये 400 धावा कराव्या लागतील. त्यानंतर बांगलादेशला 84 धावांनी गुंडाळून 316 धावांनी विजय मिळवावा लागेल. असा विजय मिळवला तरच पाकिस्तानचा रनरेट हा न्यूझीलंडपेक्षा अधिक होईल आणि पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता येईल. तिसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 450 धावा फटकवाव्या लागतील. त्यानंतर बांगलादेशला 129 धावांवर गुंडाळावे लागेल. म्हणजेच 321 धावांनी विजय मिळवल्यास पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
पण, यापैकी कोणतिही शक्यता तुर्तास तरी दिसत नाही.