लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि इंग्लंड या लढतीनं भारत-पाकिस्तान या शेजाऱ्यांना एकत्र आणले. एरवी मानगुटी पकडण्यासाठी प्रयत्नशील असलेले हात एकमेकांच्या खांद्यावर दिसले. त्याला कारणही तसेच होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना हा टीम इंडियासाठी नव्हे, तर पाकिस्तानसाठी महत्त्वाचा होता. म्हणूनच पाकिस्तानचे चाहते भारताच्या विजयासाठी जल्लोष करताना पाहायला मिळाले. इंग्लंडचा पराभव हा पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा करणारा ठरला असता, परंतु तसे झाले नाही आणि पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाद झाला अशा चर्चा सुरू झाल्या. पण, पाकिस्तान अजूनही शर्यतीत आहे... कसे? चला जाणून घेऊया...
पाकला काय करावे लागेल?नेट रन रेटचा विचार करता न्यूझीलंड ( 0.572) आघाडीवर आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट - 0.792 असा आहे. त्यामुळे किवींच्या पराभवासह त्यांना बांगलादेशवर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. किवींना मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. कागारूंचे 243 धावांचे लक्ष पार करताना किवींचा संपूर्ण संघ 157 धावांत तंबूत परतला. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी इंग्लंडविरुद्ध विजय मिळवणे हा पर्याय आहे, पण जर पराभव झाल्यास तो मोठ्या फरकाने नसावा, याची काळजी मात्र ते घेऊ शकतात. दुसरीकडे पाकिस्तानला बांगलादेशवर मोठा विजय मिळवावा लागेल.