लीडस् - पाकिस्तान संघ शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात सावध पवित्रा घेण्याची शक्यता आहे. तीन पराभव आणि एक सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर पाकवर साखळी फेरीतच बाहेर होण्याचे संकट घोंघावत होते. तथापि द. आफ्रिका आणि न्यूझीलंडला नमवून या संघाने आशा पल्लवित ठेवल्या. दुसरीकडे यजमान इंग्लंडने दोन सामने गमविल्यामुळे पाकच्या उपांत्य फेरीच्या आशा मजबूत होताना दिसतात.
पाकने अफगाणिस्तान आणि बांगलादेशला साखळी सामन्यात पराभूत केल्यास अखेरच्या चार संघात त्यांना स्थान मिळू शकते. खराब फॉर्ममध्ये असलेला शोएब मलिकऐवजी हॅरिस सोहेल याला संघात स्थान दिल्यामुळे फलंदाजीला बळ मिळाले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याच्या मार्गदर्शनात गोलंदाजीदेखील भक्कम झाली.
अफगाणिस्तान संघाने शानदार झुंझारवृत्ती दाखवून स्पर्धेत अनेकांची मने जिंकली. भारताविरुद्ध हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता, पण पराभवाचे दु:ख मागे सारून पाकविरुद्ध बहारदार खेळ करण्यावर संघाचा भर असणार आहे. पाकवर विजय नोंदवून स्पर्धेचा यशस्वी निरोप घेण्याची ही चांगली संधी आणि राशिद खान आणि गलबदीन नायब यांच्या खांद्यावर विजयाची मुख्य जबाबदारी असेल. (वृत्तसंस्था)
दोन्ही संघांदरम्यान सन २०१२ पासून आतापर्यंत ३ आंतरराष्टÑीय एकदिवसीय सामने झाले असून त्यापैकी सर्व सामने पाकने जिंकले.
दोन्ही संघ विश्वचषकात पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळतील.
सामना : दुपारी ३ वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार)