नॉटिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या सलामी लढतीत आज वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. इंग्लंडमध्ये दोन वर्षांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या चमकदार कामगिरीपासून प्रेरणा घेत पाक संघ वर्ल्ड कपमध्ये धडाक्यात सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असतील. पाकिस्तान संघाला मागील 10 वन डे सामन्यांत विजय मिळवण्यात अपयश आले आहे. सराव सामन्यातही त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. पण, हे अपयश मागे सोडून नव्या दमाने वर्ल्ड कप स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी पाक संघ सज्ज झाला आहे. विंडीजविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानने त्यांचे अंतिम 12 शिलेदार जाहीर केले आहे.
![]()
कर्णधार सर्फराज अहमद म्हणाला की, ''त्याचा संघ 2017 च्या कामगिरीपासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करेल. कारण त्यावेळीही स्थिती अशीच होती. त्यावेळी स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाने 4-1 ने पराभूत केले होते, तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सलामी लढतीत भारताविरुद्ध 124 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानने त्यानंतर दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि इंग्लंड यांचा पराभव करीत अंतिम फेरीत स्थान मिळवले आणि भारताचा पराभव करत जेतेपद पटकावले.''
![]()
स्पॉट फिक्सिंगच्या निलंबनामुळे 2011 व 2015 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर राहिल्यानंतर आपला पहिला विश्वचषक स्पर्धा खेळत असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर आक्रमक फलंदाज ख्रिस गेल व फॉर्मात असलेल्या शाय होपचा समावेश असलेल्या विंडीजच्या आघाडीच्या फळीला रोखण्यात यशस्वी ठरेल, अशी सर्फराजला आशा आहे.
![]()
वेस्ट इंडिजने गेल्या वर्षी झिम्बाब्वेमध्ये पात्रता फेरीच्या आधारावर विश्वकप स्पर्धेत स्थान मिळवले आहे आणि हा संघ गेल्या काही दिवसांमध्ये फॉर्म मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. वेस्ट इंडिजने मायदेशात जागतिक क्रमवारीतील अव्वल संघ आणि विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार इंग्लंडविरुद्धची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली होती. दरम्यान, विंडीजला आयर्लंडमध्ये तिरंगी मालिकेच्या अंतिम लढतीत बांगलादेशविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
![]()
पाकिस्तानचे BEST 12
फाखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम, मोहम्मद हाफिज, सर्फराज अहमद, हॅरीस सोहैल, आसीफ अली, शाबाद खान, इमाद वासीम, मोहम्मद आमीर, वाहब रियाज, हसन अली.