Join us  

Video : आज्जीबाई जेव्हा जसप्रीत बुमराहच्या 'यॉर्कर'ची कॉपी करतात...

ICC World Cup 2019 : भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. अहमदाबादच्या या गोलंदाजांनं अल्पावधीतच भारतीय संघाच्या प्रमुख गोलंदाजाचा मान पटकावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 11:21 AM

Open in App

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. अहमदाबादच्या या गोलंदाजांनं अल्पावधीतच भारतीय संघाच्या प्रमुख गोलंदाजाचा मान पटकावला. गोलंदाजीच्या अनोख्या शैलीमुळे बुमराहनं टाकलेल्या चेंडूचा अंदाज बांधणे भल्याभल्या फलंदाजांना अवघड जाते. डेथ ओव्हरमध्ये प्रतिस्पर्धी संघांच्या धावा रोखण्याची जबाबदारी बुमराह सक्षमपणे पार पाडत आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेतही त्यानं चोख भूमिका बजावली. वर्ल्ड कपमध्ये त्याने 18 विकेट्स घेतल्या आहे. बुमराहची ही शैली जगभरातील चाहत्यांवर भूरळ पाडत आहे.

भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एक लहान मुलगा बुमराहच्या गोलंदाजीची कॉपी करताना दिसला होता. पण, आता चक्का आज्जीबाईच बुमराहच्या यॉर्करची कॉपी करताना पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 2016मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून बुमराह आतापर्यंत 10 कसोटी, 58 वन डे आणि 42 ट्वेंटी-20 सामने खेळला आहे. त्यानं कसोटीत 49, वन डेत 103 आणि ट्वेंटी-20 51 विकेट्स घेतल्या आहेत. आयसीसीच्या गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह अव्वल स्थानावर आहे. उपांत्य फेरीत भारताचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर बुमराहनं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली होती. त्यानं लिहिलं होतं की,'' सहकारी, प्रशिक्षक, साहाय्यक प्रशिक्षक, कुटुंबातील सदस्य आणि सर्व चाहत्यांचे आभार. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला.'' आता वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तेथे तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या मालिकेत विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली जाऊ शकते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विंडीजमध्ये दाखल होईल, तर कसोटी संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे दिले जाऊ शकते. 3 ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होईल. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019जसप्रित बुमराहभारतन्यूझीलंडवेस्ट इंडिज