लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंड संघाने रंगतदार झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजवर अवघ्या 5 धावांनी मात करत यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पाचव्या विजयाची नोंद केली. न्यूझीलंडने दिलेल्या 292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेल आणि शिमरॉन हेटमायरच्या झंझावाती फलंदाजीनंतर मधली फळी कोलमडली. मात्र तुफानी शतकी खेळी करताना कार्लोस ब्रॅथवेटने लढतीत रंगत आणली होती. शतक पूर्ण केल्यानंतर ब्रॅथवेटने मारलेला एक उत्तुंग फटका ट्रेंट बोल्टने सीमारेषेनजीक टिपला आणि न्यूझीलंडला पाच धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. या निकालासह न्यूझीलंडने अपराजित मालिका कायम राखली खरी, परंतु त्यांच्या संपूर्ण संघाला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.
हरुनही 'तो' जिंकला, न्यूझीलंडच्या कर्णधारानंही ब्रेथवेटचा 'खेळ' नवाजला
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात षटकांचा वेग कमी राखल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने संपूर्ण संघाला शिक्षा सुनावली. मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी ही शिक्षा सुनावली. आयसीसीनं त्यासंबंधीत जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणले आहे की,''खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला आयसीसीच्या नियम 22.2चे उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात येत आहे. षटकांचा वेग संथ राखल्यामुळे खेळाडूंना त्यांच्या मॅच फीमधील 10 टक्के, तर कर्णधार केन विलियम्सनला 20 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. यापुढे असे पुन्हा घडल्यास विलियम्सनवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.''