बर्मिंगहॅम : द. आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम राखणाऱ्या पाकिस्तानला विश्वचषक स्पर्धेत ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या लढतीत बुधवारी न्यूझीलंडच्या तगड्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. भारताविरुद्ध पराभूत झाल्यानंतर मोठ्या टीकेला सामोरे जाणाºया पाकिस्तानने द. आफ्रिकेल्या ४९ धावांनी पराभूत केले. या निकालानंतरही त्यांची पुढील वाटचाल सोपी नाही.
पाकला आता उर्वरित तीन सामने जिंकण्यासोबतच अन्य लढतींचे निकालही अनुकूल लागण्यासाठी प्रार्थना करावी लागेल. त्यांची भिस्त वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरवर राहील. त्याने आतापर्यंत १५ बळी घेतले आहेत. पहिल्या लढतीनंतर वगळण्यात आलेला डावखुरा फलंदाज हॅरिस सोहेलने गेल्या लढतीत दमदार पुनरागमन करताना ५९ चेंडूंमध्ये ८९ धावा केल्या. शादाब खान व वहाब रियाज यांनी गेल्या लढतीत प्रत्येकी तीन, तर आमिरने दोन बळी घेतले.
दुसरीकडे न्यूझीलंड अपराजित असून गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. केन विलियम्सनने कर्णधारास साजेशी कामगिरी करत संकटमोचकाची भूमिका बजावली. द. आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने शतक केले. रॉस टेलरनेही धावा फटकावल्या आहेत, पण कॉलिन मुन्रो व मार्टिन गुप्तील यांना अद्याप छाप पाडता आलेली नाही.
हेड-टू-हेड
दोन्ही संघांदरम्यान १९७३ पासून एकूण १०६ आंतरराष्टÑीय एकदिवसीय सामने झाले असून, त्यापैकी पाकिस्तानने ५४ सामने,
तर न्यूझीलंडने ४८ सामने जिंकले आहेत. एक सामना टाय झाला असून तीन सामने अनिर्णित राहिले आहेत.
दोन्ही संघातील शेवटच्या पाच लढतीपैकी तीन सामने न्यूझीलंडने. तर एक सामना पाकिस्तानने जिंकला असून एक सामना
अनिर्णित राहिला आहे.
दोन्ही संघ विश्वचषकामध्ये
१९८६ पासून आतापर्यंत ८ वेळा आमनेसामने आले असून, यातील
६ सामन्यांमध्ये पाकिस्तानने, तर दोन सामन्यांत न्यूझीलंडने बाजी मारली आहे.
सामना :दुपारी ३ वाजल्यापासून
(भारतीय वेळेनुसार)