लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : शेवटपर्यंत निकाराची झुंज देऊनही विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिल्याने न्यूझीलंडच्या खेळाडूंना कमालीचे दु:ख झाले आहे. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी निशमने समर्थकांची माफी मागतानाच नव्या पिढीला एक भावूक संदेश दिला आहे. ''मुलांनो खेळांमध्ये करिअर करून नका, जमल्या बेकरीत काम करा किंवा अन्य काही करा आणि 60 वर्षे जगून सुखाने या जगाचा निरोप घ्या.'' असे ट्विट निशमने केले आहे.
रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघांनी जबरदस्त खेळ केला. शेवटच्या चेंडूवर ही लढत टाय झाल्याने निकालासाठी सुपरओव्हर खेळवण्यात आली. पण सुपरओव्हरमध्येही दोन्ही संघातील बरोबरी कायम राहिल्याने अखेरीस सामन्यातील चौकार षटकांरांच्या बेरजेवर विजेता ठरवण्यात आला यात इंग्लंडने बाजी मारली.
मात्र अगदी हातातोंडाशी आलेला विजय हुकणे न्यूझीलंच्या जिव्हारी लागले आहे. अशा दु:खी मनस्थितीतच न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडून जिमी निशम याने ट्विट करून आपल्या समर्थकांची माफी मागितली आहे. ''आज आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व समर्थकांचे मी आभार मानतो. तुमचा पाठिंब्याचा आवाज मैदानानर आम्हाला ऐकू येत होता. आम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, आम्हाला माफ करा.
काल झालेल्या फायनलबाबत निशम म्हणतो. ''हे दु:खद आहे. पुढची एक वा दोन दशके अशी असतील जेव्हा मी कुठल्याही सामन्याच्या शेवटच्या अर्ध्या तासाचा विचारही करणार नाही. इंग्लंडच्या संघाला शुभेच्छा. ते विजेतेपदासाठी पात्र होते.