Join us

ICC World Cup 2019: रबाडाची 'डेंजर' पॉवर; बॅटकडे बघतच बसला टीम इंडियाचा 'गब्बर'

ICC World Cup 2019 India vs South Africa : एका चेंडूतून त्याची पॉवर सगळ्यांनाच कळून चुकली.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 15:13 IST

Open in App
ठळक मुद्देसचिन तेंडुलकरनं टीम इंडियाला रबाडापासून सावध राहण्याचा इशारा दिला होता. रबाडानं आपल्या १० ओव्हर्समध्ये ३९ धावांच्या बदल्यात दोन विकेट्स घेतल्या.रबाडानं शिखर धवनची विकेट घेतलीच, पण त्याच्या बॅटचीही 'विकेट' काढली.

कागिसो रबाडा... आयपीएल २०१९ मध्ये सगळ्यात खतरनाक ठरलेला गोलंदाज... दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळताना त्यानं १२ सामन्यांत २५ विकेट्स घेतल्या होत्या... भल्या-भल्यांना तंबूचा रस्ता दाखवला होता. त्याचा हा फॉर्म पाहूनच, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला, रबाडापासून सावध राहण्याचा इशारा दिला होता. तो किती अचूक होता, हे रबाडाचे गोलंदाजीचे आकडे सांगतातच, पण एका चेंडूतून त्याची पॉवर सगळ्यांनाच कळून चुकली.  

दक्षिण आफ्रिकेनं भारताला विजयासाठी २२८ धावांचं आव्हान दिलं होतं. विराटसेनेतील फलंदाजांची रांग बघता ते सोपंच म्हणता येईल. परंतु, कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस यांनी अत्यंत भेदक मारा केला. त्यामुळे हे लक्ष्य गाठण्यासाठी भारताला ४७.३ ओव्हर लागल्या. रबाडानं आपल्या १० ओव्हर्समध्ये ३९ धावांच्या बदल्यात दोन विकेट्स घेतल्या. त्याची आक्रमकता फलंदाजांना धडकी भरवणारीच होती. त्यानं शिखर धवनची विकेट घेतलीच, पण त्याच्या बॅटचीही 'विकेट' काढली.

आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये रबाडानं शिखर धवनला यॉर्कर टाकला. ताशी १४६ किलोमीटर वेगाचा हा चेंडू खेळताना 'गब्बर'च्या बॅटचा तुकडाच हवेत उडाला. ही तुटलेली पाहून धवनही चकित झाला. त्यानं रबाडाकडे पाहून हसत हसत आश्चर्य व्यक्त केलं. त्यानंतर, यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकनं त्याला बॅटचा तुकडा आणून दिला आणि धवननं बॅट बदलली. 

अर्थात, या नव्या बॅटनं शिखर फार काही करू शकला नाही. कारण, रबाडानंच त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये धवनला चकवलं. रबाडाचा सुस्साट चेंडू धवनच्या बॅटची कड घेऊन डी कॉकच्या ग्लोव्हजमध्ये विसावला आणि भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर, के एल राहुललाही रबाडानं माघारी धाडलं. परंतु, रोहित शर्मानं सर्व गोलंदाजांचा टिच्चून सामना केला.  त्यानं १३ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद १२२ धावांची खणखणीत खेळी साकारली. महेंद्रसिंग धोनीनंही ३४ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या जोडीनं भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. 

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019शिखर धवनरोहित शर्मा