श्रीनगर - क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये रविवारी झालेल्या लढतीत भारताला यजमान इंग्लंडकडून 31 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, भारतीय संघ या लढतीत भगवी जर्सी परिधान करून मैदानात उतरल्याने पराभूत झाला, असा अजब दावा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारताचा पराभव झाल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी एक ट्विट करून भारतीय संघाच्या पराभवाचे कारण सांगितले. त्या म्हणाल्या, तुम्ही मला अंधश्रद्धाळू म्हणू शकता. पण या भगव्या जर्सीनेच विश्वचषकातील भारताच्या विजयाची मालिका खंडित केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा 31 धावांनी पराभव झाला. या लढतीत भारतीय संघ आपल्या पारंपरिक निळ्या जर्सीऐवजी निळ्या भगव्या रंगाची जर्सी परिधान करून मैदानात उतरला होता.
दरम्यान, अन्य एक काश्मिरी नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही भारतीय संघाच्या पराभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पाकिस्तान आणि इंग्लंडच्या जागी जर भारताचे उपांत्य फेरीतील स्थान पणाला लागले असते तरी भारतीय संघाने असाच खेळ केला असता का? असा सवाल ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.