Join us

ICC World Cup 2019: श्रीलंकेपुढे यजमान इंग्लंडचे तगडे आव्हान

स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीलंकेला विजय आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 07:09 IST

Open in App

लीड्स : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागचा सामना ८७ धावांनी गमविणाऱ्या श्रीलंकेला शुक्रवारी जेतेपदाचा दावेदार इंग्लंडविरुद्ध खेळायचे असल्याने आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना सर्वोत्तम खेळ करावा लागेल.पाच सामन्यात चार गुण मिळाल्याने लंकेचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. उपांत्य फेरीसाठी त्यांना पुढील चारही सामने जिंकावेच लागतील. १९९६ चा विश्वचषक विजेता श्रीलंका सघ सलामीला पराभूत झाल्यानंतर पुढील दोन सामने पावसामुळे रद्द झाले होते. जगज्जेत्या आॅस्ट्रेलियाकडून लंडनमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. आता बाद फेरीसाठी इंग्लंडला नमविण्याचे अवघड आव्हान असेल.इंग्लंडने पाचपैकी चार सामने जिंकले. पाककडून झालेल्या पराभवानंतर सुधारणा करीत इंग्लंड दुसऱ्या स्थानी आला. पाचपैकी चार वेळा त्यांनी ३०० च्या वर धावा उभारल्या. बांगलादेशविरुद्ध ६ बाद ३८६ आणि अफगाणिस्तानविरुद्ध ६ बाद ३९६ अशी विक्रमी धावसंख्या उभारली. सर्वाधिक धावा काढणाऱ्या अव्वल दहा फलंदाजांत इंग्लंडचे पाच फलंदाज आहेत.अफगाणिस्तानविरुद्ध जेसन रॉय खेळला नव्हता, पण मॉर्गनने त्याची उणीव जाणवू दिली नाही. १७ षटकारांसह मॉर्गनने १४८ धावा ठोकल्या होत्या. इंग्लंडची भक्कम फलंदाजी थोपविण्याची जबाबदारी लंकेचे वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आणि नुआन प्रदीप यांच्यावर असेल. याशिवाय प्रत्येक सामन्यात अपयशी ठरत असलेल्या मधल्या फळीला धावा काढाव्याच लागतील. न्यूझीलंडविरुद्ध लंकेने १४ धावात पाच गडी गमावताच संघ १३६ धावात गारद झाला. अफगाणिस्तानविरुद्ध ३६ धावात ७ फलंदाज बाद होताच संघाचा डाव २०१ धावांत संपुष्टात आला. आॅस्ट्रेलियाविरुद्धही ३ बाद २०५ वरून हा संघ २४७ धावात बाद झाला. आता श्रीलंका संघाला जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांच्यासारख्या गोलंदाजांना तोंड द्यावे लागेल. आर्चरने १२ तर वुडने ९ गडी बाद केले आहेत. (वृत्तसंस्था)हेड-टू-हेडदोन्ही संघांदरम्यान सन १९८२ पासून आतापर्यंत ७४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले असून त्यापैकी इंग्लंडने ३६, तर श्रीलंकेने ३५ सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना बरोबरीत सुटला असून २ सामने अनिर्णित राहिले आहेत.दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतीमधील ३ सामने इंग्लंडने, तर एका सामन्यात श्रीलंकेने बाजी मारली आहे.एक सामना अनिर्णित राहिला आहे.दोन्ही संघ विश्वचषकामध्ये १९८३ पासून आतापर्यंत १०वेळा आमनेसामने आले असून यातील सहा सामन्यांत इंग्लंडने, तर चार सामन्यांत श्रीलंकेने विजय मिळवला आहे.विश्वचषकात इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध ३३३, तर श्रीलंकेने इंग्लंडविरूद्ध ३१२ अशी सर्वाेच्च धावसंख्या उभारली आहे.इंग्लंडची श्रीलंकेविरुद्ध १३७, तर श्रीलंकेची नीचांकी धावसंख्या १३६ आहे.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंडश्रीलंका