Join us

आयसीसी वर्ल्डकप 2019 : गूड न्यूज... विजय शंकर ठरला फिट

शंकरची वैद्यकीय चाचणी झाली असून त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 18:12 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी भारताला विजय शंकरच्या रुपात धक्का बसेल, असे काही जणांना वाटत होते. पण शंकरची वैद्यकीय चाचणी झाली असून त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

शुक्रवारी भारतीय संघ नेट्समध्ये सराव करत होता. त्यावेळी वेगवान गोलंदाज खलील अहमदचा एक चेंडू शंकरच्या डाव्या हाताला लागला होता. हा चेंडू एवढ्या जोरात शंकरला लागला की त्यानंतर तो थेट मैदान सोडून गेला होता. त्यावेळी शंकरची ही दुखापत गंभीर असल्याचे बऱ्याच जणांना वाटले होते. शंकरच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचेही म्हटले गेले होते. पण अखेर वैद्यकीय चाचणीचे अहवाल आल्यानंतर शंकरच्या हाताला फ्रॅक्चर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शंकर आता फिट असला तरी त्याला सराव सामन्यात खेळवणार नसल्याचे म्हटले जात आहे. आज सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शंकरला संधी देण्यात आली नाही. त्याचबरोबर मंगळवारी होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही शंकरला विश्रांती देण्यात येणार आहे.

लोकेश राहुल फेल,: भारताचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायमभारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही.  वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. आज भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सराव सामना सुरु आहे. या सराव सामन्यात लोकेश राहुलला चौथ्या स्थानावर फलंदाजीला पाठवले होते. पण राहुलला फक्त सहाच धावा करता आल्या. त्यामुळे भारताचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम असल्याचे म्हटले जात आहे.

यापूर्वी भारताने महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, विजय शंकर, लोकेश राहुल, असे बरेच पर्याय चौथ्या स्थानासाठी प्रयोग करून पाहिले होते. पण चौथ्या स्थानावर नेमका कोण फलंदाज खेळायला हवा, याचे उत्तर मात्र अजूनही सापडलेले नाही. वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी बऱ्याच माजी क्रिकेटपटूंनी चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज खेळायला हवा, याबाबत आपली मते व्यक्त केली होती.

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोणी खेळावे याची चर्चा अजून सुरुच आहे. या चर्चेत अनेक दिग्गजांनी आपापली मतं मांडली आणि यांच्यात भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याचीही एन्ट्री झाली आहे. 

तो म्हणाला,''परिस्थिती पाहून संघाने हा निर्णय घ्यायला हवा. सध्यातरी विजय शंकरने या क्रमांकावर खेळावे, परंतु संघात लवचिकता असायला हवी. जर आपण वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहत आहोत, तर या गोष्टीचा अधिक विचार करण्याची गरज नाही. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहायला हवे. रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली हे आघाडीची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील.'' 

 भारतीय संघ वर्ल्ड कपसाठी सज्ज झाला आहे. पण सध्याच्या घडीला वर्ल्ड कपमधील फक्त एकच चिंता सतावत आहे आणि ती म्हणजे चौथ्या क्रमांकावर कोणत्या फलंदाजाला संधी द्यायची. या समस्येवर भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी एक सल्ला दिला आहे.

वेंगसरकर म्हणतात, " भारतीय संघ समतोल आहे. त्यामुळे भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीतपर्यंत पोहोचेल. त्यानंतर संघाला प्रतिस्पर्धी संघांकडून कडवी लढत मिळू शकते. सध्याच्या घडीला चौथ्या क्रमांकावर कोणत्या फलंदाजाला पाठवायचे, हा भारतीय संघापुढे पेच असावा. रोहित शर्मा आणि शिखर धवन हे सलामीला येतील, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली येईल. पण त्यानंतर चौथ्या क्रमांकासाठी लोकेश राहुलला संधी द्यायला हवी. कारण तोच एक चांगलाच पर्याय दिसत आहे. कारण इंग्लंडमध्ये खेळण्याचा राहुलला चांगलाच अनुभव आहे. हा अनुभव नक्कीच त्याच्या कामाला येईल."

टॅग्स :वर्ल्ड कप 2019