साउदॅम्पटन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाला वर्ल्ड कपमध्ये खेळताना पाहण्याची प्रतीक्षा अवघ्या काही तासांत संपणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होऊन 6 दिवस झाले, तरीही हवे तसे वातावरण निर्माण झालेले नाही. जगभरातील चाहते विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहे. जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये आघाडीवर असलेल्या टीम इंडियावर पहिल्या सामन्यापूर्वीच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्या जर्मन संघातील दिग्गज खेळाडू थॉमस म्युलरनेही कोहलीला पहिल्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कोहलीनंही त्यावर प्रतिक्रिया नोंदवली.
कॅप्टन कोहली पहिल्याच सामन्यात करणार भीमकाय पराक्रम?साउदम्टन येथील दी रोज बाऊल स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्याच सामन्यात कोहलीला दोन विक्रम नोंदवण्याची संधी आहे. कोहलीची प्रत्येक खेळी हा एक वेगळा विक्रमच असतो... यामुळेच आतापर्यंत त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याच्याकडून अशाच विक्रमी खेळींची अपेक्षा आहे. भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात आफ्रिकेला नमवल्यास कर्णधार म्हणून कोहली विजयाचे अर्धशतक पूर्ण करेल. त्याच्या नावावर आतापर्यंत 49 विजय आहेत.