साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. ख्रिस वोक्सनं विंडीजच्या इव्हीन लुईसला माघारी पाठवून इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. वोक्सने विंडीजचा स्फोटक फलंदाज गेलचाही विकेट घेतला असता, परंतु मार्क वूडनं त्याचा झेल सोडला. गेलचा झेल सोडणं इंग्लंडला महागात पडण्याची चिन्ह सध्यातरी दिसत आहे. कारण गेलनं आज विक्रमी कामगिरी केली आहे. त्याने सामन्यात 24 वी धाव घेताच इंग्लंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विंडीजच्या फलंदाजांत त्यानं अव्वल स्थान पटकावलं आहे. त्यानं सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा 1619 धावांचा विक्रम मोडला. रिचर्ड्स यांनी 34 डावांत 57.82च्या सरासरीनं 3 शतकं व 11 अर्धशतकांच्या जोरावर ही कामगिरी केली आहे. नाबाद 189 ही त्यांची सर्वोत्तम खेळी आहे.
पण, लायम प्लंकेटनं इंग्लंडच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. त्यानं गेलला जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. गेलने 41 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार लगावून 36 धावा केल्या. त्यानंतर मार्क वूडनं शे होपला माघारी पाठवले. होप 11 धावांत तंबूत परतला. विंडीजचे तीन फलंदाज 55 धावांत पेव्हेलियनमध्ये परतले होते.