Join us  

ही तर भाजपाची खेळी; मुस्लीम असल्यानं शमीला श्रीलंकेविरुद्ध खेळवलं नाही; पाकिस्तानी चॅनलवर मुक्ताफळं!

ICC World Cup 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध संघाल दोन बदल केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 12:35 PM

Open in App

लाहोर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध संघाल दोन बदल केले होते. या सामन्यात भारतीय संघाने फॉर्मात असलेल्या मोहम्मद शमीसह फिरकीपटू युजवेंद्र चहल यांना विश्रांती दिली होती. त्यांच्या जागी संघात भुवनेश्वर कुमार व रवींद्र जडेजा यांनी स्थान पटकावले होते. भारतीय संघाने हा सामना 7 विकेट राखून सहज जिंकला. रोहित शर्मा व लोकेश राहुल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 256 धावांचे लक्ष्य सहज पार केले. या सामन्यात शमीला दिलेली विश्रांती ही पाकिस्तानमधील क्रिकेट तज्ज्ञांना पटलेली नाही. त्यांनी थेट शमी मुस्लीम असल्यानं भाजपाच्या दबावामुळे त्याला विश्रांती देण्यात आली, असा दावा केला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली होती. त्यानंतर पुढील सामन्यात शमीला संधी मिळाली आणि त्यानं चार सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या. शिवाय चेतन शर्मा यांच्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठलला होता. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 40 धावांत 4 विकेट घेतल्या होत्या आणि त्यात अखेरच्या षटकातील हॅटट्रिकचा समावेश आहे. तरीही श्रीलंकेविरुद्ध त्याला बाकावर बसवण्यात आले आणि भुवीचे पुनरागमन झाले.

भारतीय संघाच्या अखेरच्या साखळी सामन्यावर चर्चा करताना पाकिस्तानातील एका चॅनेलवर क्रिकेट तज्ज्ञांनी हे भाजपाचे षडयंत्र असल्याचा दावा केला.''मी शमीला डच्चू दिला नसता. त्याने चार सामन्यांत 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याला असे बाकावर बसवू शकत नाही. त्याला विक्रम करण्याची संधी होती आणि शिवाय तो सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये अव्वल दोन किंवा तीन स्थानांवर पोहोचला असता. शमीला बाकावर बसवण्यासाठी कोणीतरी दबाव टाकला असावा. भाजपाचा जो मुस्लीमविरोधी अजेंडा आहे, हा त्याचाच भाग असावा,'' असे मत क्रिकेटतज्ज्ञाने व्यक्त केले.  

 

पाहा व्हिडीओ...शमीच्या संघातील समावेशावरुन अशी मुक्ताफळं प्रथमच उधळली गेलेली नाही. यापूर्वी पाकिस्तानचा माजी खेळाडू अब्दुल रजाकने शमी मुस्लीम आहे, म्हणून चांगली कामगिरी करत आहे, असे विधान केले होते. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019मोहम्मद शामीभारतश्रीलंका