Join us  

ICC World Cup 2019 : इंग्लंडचा पराभव ही तर बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तानसाठी गुड न्यूज

ICC World Cup 2019 : श्रीलंकेपाठोपाठ यजमान इंग्लंड संघाला मंगळवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाकडूनही हार पत्करावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 9:29 AM

Open in App

लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : श्रीलंकेपाठोपाठ यजमान इंग्लंड संघाला मंगळवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाकडूनही हार पत्करावी लागली. या पराभवामुळे इंग्लंडच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग अधिक खडतर बनला आहे. इंग्लंडला आता उर्वरित दोन्ही सामन्यांत भारत आणि न्यूझीलंड यांना पराभूत करावेच लागणार आहे. 

यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रथम प्रवेश करण्याचा मान गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने पटकावला. न्यूझीलंड आणि भारत उंबरठ्यावरच आहेत, परंतु चौथ्या स्थानासाठी आता इंग्लंडसह आणखी तीन संघ आहेत. इंग्लंडचा हा पराभव बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना आशेचा किरण दाखवणारा ठरला आहे.

अ‍ॅरोन फिंचचे खणखणीत शतक आणि त्याला डेव्हीड वॉर्नर ( 53), स्टीव्हन स्मिथ ( 38) व अ‍ॅलेक्स केरी ( 38) यांची साथ लाभली. एका वेळी ऑस्ट्रेलियाचा संघ 350 धावा सहज कुटतील असे वाटत होते, परंतु इंग्लंडने त्यांना 285 धावांवरच समाधान मानण्यास भाग पाडले. लॉर्ड्सच्या मैदानावर 275+ धावांचा पाठलाग करणे नेहमी अवघडच होते आणि कोणत्याही संघाला आतापर्यंत यश मिळाले नव्हते. त्यामुळे इंग्लंड येथे विजय मिळवून इतिहास घडवतील अशी भाबडी आशा होती. 

पण, जेसन बेहरेनड्रॉफनं इंग्लंडच्या स्वप्नांना सुरूंग लावला. त्यानं 44 धावांत इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याल साथ मिळाली ती मिचेल स्टार्कची. त्यानंही 43 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. बेन स्टोक्स इंग्लंडला विजय मिळवून देईल असे वाटत होते, परंतु स्टार्कच्या अप्रतिम यॉर्करने त्याचा त्रिफळा उडवला आणि लॉर्ड्सवर स्मशान शांतता पसरली. इंग्लंडच्या उरलेल्या आशाही संपुष्टात आल्या. त्यांचा संपूर्ण संघ 221 धावांत तंबूत परतला. इंग्लंडच्या या पराभवानं श्रीलंका, बांगलादेशपाकिस्तानच्या आशा पल्लवीत केल्या आहेत.

कोणाचे किती गुण व किती सामने इंग्लंड 7 सामने, 4 विजय, 3 पराभव, 8 गुणउर्वरित सामने - भारत आणि न्यूझीलंड 

बांगलादेश7 सामने, 3 विजय, 1 अनिर्णीत, 3 पराभव, 7 गुणउर्वरित सामने - भारत आणि पाकिस्तान 

श्रीलंका6 सामने, 2 विजय, 2 अनिर्णीत,  2 पराभव, 6 गुणउर्वरित सामने - दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व भारत

पाकिस्तान 6 सामने, 2 विजय, 1 अनिर्णीत, 3 पराभत, 5 गुणउर्वरित सामने - न्यूझीलंड, अफगाणिस्तान व बांगलादेश

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंडआॅस्ट्रेलियापाकिस्तानबांगलादेशश्रीलंका