लंडन : आयसीसी विश्वचषकात योग्यवेळी फॉर्ममध्ये आलेला जगज्जेता आॅस्ट्रेलिया शनिवारी शेजारी न्यूझीलंडविरुद्ध भिडेल. यावेळी उभय संघात श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची चढाओढ पहायला मिळणार आहे. मागच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडला स्पर्धेत पहिला पराभव पत्करावा लागला. आता आॅसीविरुद्ध विजय नोंदवून पुन्हा विजयी पथावर परतण्याचा किवींना विश्वास आहे.
आॅस्ट्रेलियाने भारताविरुद्धचा पराभव वगळता दमदार कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीत दाखल झालेला हा पहिलाच संघ आहे. न्यूझीलंडचे ११ गुण असून उपांत्य फेरीसाठी दोनपैकी किमान एक सामना जिंकणे अनिवार्य आहे. हा संघ आॅस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यापैकी एका संघाला हरविण्यात यशस्वी ठरला, तर चौथ्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठतील.
विश्वचषकात उभय संघ २०१५ ला फायनल खेळले होते. यंदाही आॅस्ट्रेलियाचे पारडे जड वाटते. तटस्थस्थळी दोन्ही संघ २० सामने खेळले असून त्यात आॅस्ट्रेलियाने १९ वेळा बाजी मारली. न्यूझीलंडने एकमेव सामना १९९९च्या विश्वचषकत जिंकला होता.
फिंच व डेव्हिड वॉर्नर यांची सलामी जोडी फॉर्ममध्ये आहे. वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने आतापर्यंत १९ गडी बाद केले आहेत. जेसन बेहरेनडोर्फनेही इंग्लंडविरुद्ध ५ बळी घेत उपयुक्तता सिद्ध केली.
न्यूझीलंड पुन्हा एकदा कर्णधार केन विलियम्सनवर विसंबून असेल. त्याने ४१४ धावा केल्या आहेत. आॅस्ट्रेलियाविरुद्ध त्याने एकमेव शतक २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान साजरे केले होते. हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. (वृत्तसंस्था)
हेड-टू-हेड
दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतीमधील प्रत्येकी २ सामने आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे.
दोन्ही संघ विश्वचषकामध्ये १९८७ पासून आतापर्यंत १० वेळा आमनेसामने आले असून यातील ३ सामन्यांमध्ये न्यूझीलंडन, तर ७ सामने आॅस्ट्रेलियाने जिंकले आहेत.
दोन्ही संघांदरम्यान सन
१९७४ पासून आतापर्यंत १३६ आंतरराष्टÑीय एकदिवसीय सामने झाले असून त्यापैकी आॅस्ट्रेलियाने ९० सामने, तर न्यूझीलंडने ३९ सामने जिंकले आहेत. याशिवाय ७ सामने
अनिर्णित राहिले आहेत.
सामना : सायंकाळी ६ वाजल्यापासून (भारतीय वेळेनुसार)