- ग्रॅमी स्मिथ
दक्षिण आफ्रिका संघासाठी ही निर्णायक वेळ आहे. न्यूझीलंड संघ फॉर्मात आहे. ही बाब विश्वचषक स्पर्धेपूर्वीही मी बोललो आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलीकडे झालेल्या सामन्यात असो किंवा विश्वचषक स्पर्धेतील त्यांची आतापर्यंतही कामगिरी असो, पण दोन्ही बाबींचा विचार केला, तर न्यूझीलंडचे पारडे वरचढ भासते. दक्षिण आफ्रिका संघाला गेल्या दोन स्पर्धेत पराभूत केल्यानंतर न्यूझीलंड संघाला यावेळी पुन्हा तशी संधी आहे. दक्षिण आफ्रिका संघापुढे अनेक अडचणी आहेत. विश्वकपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तुमच्या अनुभवी खेळाडूंकडून चमकदार कामगिरी होणे आवश्यक असते, हे मी यापूर्वीही बोललो आहे.
न्यूझीलंडतर्फे मार्टिन गुप्तील, केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांनी पुढे सरसावत जबाबदारी स्वीकारलेली आहे तर क्विंटन डिकॉकचा अपवाद वगळता दक्षिण आफ्रिकेचा अन्य कुठलाही खेळाडू जबाबदारी स्वीकारत असल्याचे दिसत नाही. दक्षिण आफ्रिका संघाला आपल्या फलंदाजीबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. हाशिम अमलाला खेळविण्याचा निर्णय योग्य आहे. तो अजिबात फॉर्मात असल्याचे दिसत नाही. डोक्याला मार लागल्यानंतर तो वेगवान गोलंदाजांविरुद्ध सहज भासत नाही आणि न्यूझीलंड संघ याचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील राहील. विशेषता ट्रेंट बोल्ट आणि लोकी फर्ग्युसन. न्यूझीलंडतर्फे लौकीची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. विशेषता उपखंडातील देशांविरुद्ध त्याचा वेगवान मारा भेदक ठरतो. त्याने या विश्वकप स्पर्धेत प्रति षटक ३.८८ च्या सरासरीने धावा देत ८ बळी घेतले. त्याने मॅट हेन्री व ट्रेंट बोल्टला योग्य साथ दिली आहे. बोल्ट नेहमीच प्रभावी ठरतो. त्याच्याकडे कमालीचे कौशल्य आहे. तो फलंदाजांच्या तंत्राची परीक्षा घेणारा गोलंदाज आहे. एजबॅस्टनमध्ये वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी राहण्याची आशा आहे. त्याचा गोलंदाजांसह फलंदाजांनाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. एक बाब निश्चित की, द. आफ्रिकाला वर्चस्व गाजवण्याचा मार्ग शोधावाच लागेल.