बर्मिंगहॅम : वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी संघात परतल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ आता न्यूझीलंडविरुद्ध बुधवारी २०१५ मध्ये उपांत्य फेरीतील पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. दुसरीकडे, किवी संघ गुणतालिकेत पुन्हा आघाडीचे स्थान पटकावण्यास प्रयत्नशील आहे.
दक्षिण आफ्रिकाला गेल्या स्पर्धेत न्यूझीलंडने उपांत्य फेरीत पराभूत केले होते. विश्वचषकमध्ये दक्षिण आफ्रिका संघाला पहिल्या तीन लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागला, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. त्यांना एकमेव विजय अफगाणिस्तानविरुद्ध मिळवता आला.
न्यूझीलंड अपराजित असून तीन विजय व एक सामना रद्द झाल्यानंतर ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहेत. डेल स्टेन व एनरिच नोर्जे दुखापतग्रस्त झाल्याने द. आफ्रिकेची गोलंदाजी कमकुवत झाली. एनगिडी पूर्ण तंदुरुस्त असून बुधवारी तो खेळेल. कर्णधार फाफ डूप्लेसिस म्हणाला, ‘यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावेल. आम्हाला प्रत्येक सामना जिंकायचा असल्याने अपेक्षांचे ओझे जाणवत आहे.’
द. आफ्रिकाच्या गोलंदाजीची भिस्त लेग स्पिनर इम्रान ताहिरवर असेल. फलंदाजीत क्विंटन डिकॉक व हाशिम अमला यांनी गेल्या लढतीमध्ये चांगली कामगिरी केली होती. फिरकीपटूंविरुद्ध द. आफ्रिकेची निराशाजनक कामगिरी बघता न्यूझीलंड संघ लेग स्पिनर ईश सोढी याला मिशेल सँटनेरसह संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेड-टू-हेड
दोन्ही संघांदरम्यान आतापर्यंत ७० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले असून त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने ४१ सामने, तर न्यूझीलंडने २४ सामने जिंकले आहेत. याशिवाय ५ सामने अनिर्णित राहिले आहेत.
दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतीमधील ३ सामने दक्षिण आफ्रिकेन, तर दोन सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली आहे.
विश्वचषकामध्ये दोन्ही संघ आतापर्यंत सातवेळा आमनेसामने आले असून यातील पाच सामन्यांमध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला आहे आणि दोन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली आहे.