Join us

ICC World Cup 2019: वेस्ट इंडिजमध्ये विश्वचषक जिंकण्याची क्षमता - लॉईड

विंडीजने चार सामने खेळले असून एक जिंकला, तर दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला. तसेच एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 03:07 IST

Open in App

लंडन : वेस्ट इंडिजने आतापर्यंत एकच विजय मिळविला असला तरी महान खेळाडू आणि माजी कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांनी या संघात विश्वचषक जिंकण्याची क्षमता असल्याचा दावा केला. विंडीजने चार सामने खेळले असून एक जिंकला, तर दोन सामन्यात त्यांचा पराभव झाला. तसेच एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.आयसीसी संकेतस्थळावरील आपल्या स्तंभात लॉईड यांनी फलंदाजी व गोलंदाजीत विंडीज बलाढ्य असल्याचे म्हटले. अव्वल चार संघांत स्थान मिळविण्यासाठी कुठल्याही संघासाठी ११ गुण पुरेसे असतील. विंडीजला न्यूझीलंड व भारताचा सामना करायचा आहे. विंडीजसाठी आता नव्हे, तर कधी नव्हे अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.लॉईड यांच्या नेतृत्वात विंडीजने १९७५ आणि १९७९ चा विश्वचषक जिंकला होता. विंडीज संघ काय करू शकतो, हे यंदा दाखविण्याची वेळ आली असल्याचे लॉईड यांचे मत आहे. ते पुढे लिहितात, ‘अशा स्पर्धेत नेहमी पराभवाचे धक्के बसतात. अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागते. आता मात्र विंडीजने वाईट दिवस मागे टाकून चांगल्या दिवसांचा विचार करावा. उपांत्य फेरीत स्थान निश्चितीसाठी विंडीजला आता सर्वच साखळी सामने जिंकणे आवश्यक झाले आहे. इंग्लंडकडून विंडीज संघ पराभूत झाल्याचे मला फार वाईट वाटले.’स्पर्धा चुकीच्या वेळी होत असल्याचे नमूद करीत विंडीजची फलंदाजी आतापर्यंतची सर्वात वाईट असल्याचे लॉॅईड म्हणाले. ‘इंग्लंडच्या वेगवान माऱ्याला यशस्वीपणे तोंड दिल्यानंतर जो रुटसारख्या पार्टटाईम गोलंदाजाविरुद्ध बळी दिल्याचे वाईट वाटले,’ असे लॉईड यांनी आपल्या स्तंभात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :वर्ल्ड कप 2019वेस्ट इंडिज