ICC Womens World Cup 2025, India Women Almost Confirmed A Seat For Semifinal : स्मृती-प्रतीकाचा विक्रमी धमाका, जेमिमाची तुफान फटकेबाजी आणि धावांचा बचाव करताना गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघानं न्यूझीलंडविरुद्ध धमाकेदार विजय नोंदवला आहे. नवी मुंबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात विक्रमांची 'बरसात' करत टीम इंडियानं अगदी दिमाखात सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्मृती-प्रतीकाची विक्रमी भागीदारी
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीची बॅटर प्रतीका रावल आणि स्मृती मानधना या दोघींनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी द्विशतकी (२१२) भागीदारी रचत इतिहास रचला. स्मृती मानधना हिने ९५ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने १०९ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला प्रतीका रावलनं संघाकडून १३४ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १२२ धावांची सर्वोच्च खेळी साकारली.
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
अखेरच्या षटकात जेमिमाची तुफान फटकेबाजी
भारतीय संघाच्या सलामीच्या बॅटर्सनी पाया भक्कम करून दिल्यावर जेमिमा रॉड्रिग्जनं तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. मुंबईकर छोरीनं घरच्या मैदानात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५५ चेंडूत ११ चौकाराच्या मदतीने नाबाद ७६ धावांची खेळी करत पावसाच्या व्यत्ययामुळे ४९ षटकांच्या सामन्यात भारतीय संघाच्या धावफलकावर ३४० धावा लावल्या होत्या. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने उभारलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
टीम इंडियानं ३४० धावा करून न्यूझीलंडला मिळालं ३२५ धावांचं टार्गेट
डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, न्यूझीलंडच्या संघाला ४४ षटकात ३२५ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. या धावांचा पाठलाग करताना क्रांती गौड हिने न्यूझीलंडच्या संघाला पहिला धक्का दिला. जॉर्जिया प्लिमर आणि अमेलिया केर जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. मग पिक्चरमध्ये आली रेणुका ठाकूर. तिने २५ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारांसह ३० धावांवर खेळणाऱ्या जॉर्जिच्या खेळीला ब्रेक लावला. कर्णधार सोफी डिव्हाइनही रेणुकाच्या जाळ्यात अडकली. तिने ९ चेंडूत ६ धावांची खेळी केली. अमेरिया केर ४५ धावा करून बाद झाली. स्नेह राणानं तिला स्मृती मानधना करवी झेलबाद केले. शतकी खेळीनंतर गोलंदाजीत हात आजमावताना प्रतीका रावलनं मॅडी ग्रीनच्या रुपात न्यूझीलंडच्या संघाला पाचवा धक्का दिला. दीप्ती आणि श्री चरणी यांनीही प्रत्येकी १-१ विकेट घेतली. धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाकडून ब्रुक हालीडे हिने सर्वाधिक धावा करताना ८४ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. याशिवाय इझाबेला गेझ हिने ५१ चेंडूत नाबाद ६५ धावांची खेळी केली. ४४ षटकात न्यूझीलंडच्या संघाला ८ विकेट्सच्या मोबदल्यात २७१ धावांपर्यंतच मजल मारता आली.