Join us

हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...

ICC Women's World Cup 2025: काही स्वप्नं ही झटकन पूर्ण होतात. तर काही स्वप्नांची पूर्तता होण्यासाठी अनेक वर्षं जातात, पिढ्या खपतात. मात्र जेव्हा उराशी बाळगलेलं असं स्वप्न पूर्ण होतं, तेव्हा तो दिवस अविस्मरणीय ठरतो. भारतीय क्रिकेटसाठी २ नोव्हेंबर २०२५ हा दिवस असाच सुवर्णाक्षरांनी नोंद करावा इतका ऐतिहासिक ठरलाय.

By बाळकृष्ण परब | Updated: November 4, 2025 15:06 IST

Open in App

-बाळकृष्ण परब काही स्वप्नं ही झटकन पूर्ण होतात. तर काही स्वप्नांची पूर्तता होण्यासाठी अनेक वर्षं जातात, पिढ्या खपतात. मात्र जेव्हा उराशी बाळगलेलं असं स्वप्न पूर्ण होतं, तेव्हा तो दिवस अविस्मरणीय ठरतो. भारतीय क्रिकेटसाठी २ नोव्हेंबर २०२५ हा दिवस असाच सुवर्णाक्षरांनी नोंद करावा इतका ऐतिहासिक ठरलाय. त्याचं कारण म्हणजे रंगतदार झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला धूळ चारत भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच महिला विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली. त्याबरोबरच अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेलं क्रिकेटमधील विश्वविजेतेपद पटकावण्याचं भारतीय महिला क्रिकेटचं स्वप्न पूर्ण झालं.

घरच्या मैदानावर होत असलेली स्पर्धा, त्यात गेल्या काही वर्षांत पुरुषांच्या संघाला मिळणाऱ्या सोईसुविधांच्या तोडीस तोड मिळालेल्या सुविधांमुळे उंचावलेला दर्जा, संघात असलेला एका पेक्षा एक प्रतिभावंत खेळाडूंचा समावेश यामुळे भारतीय महिला संघासाठी या वर्ल्डकपमध्ये ‘आता नाही तर कधीच नाही’, अशी परिस्थिती होती. पण या स्पर्धेच्या सुरुवातीला हा संघ अपेक्षेनुरूप कामगिरी करू शकला नाही. श्रीलंका, पाकिस्तान या तुललेने दुबळ्या शेजाऱ्यांविरोधात आपण विजय मिळवले. पण ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध अटीतटीच्या लढती थोड्या थोड्या फरकाने हातच्या गेल्या. त्यामुळे आता मायदेशातच होत असलेल्या विश्वचषकातून या संघाला प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागतो की काय असं वाटू लागलं होतं. उपांत्य फेरी गाठायची असेल तर न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल, अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली,  पण भारताच्या या जिगरबाज रणरागिणी खचून गेल्या नाहीत. उलट स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी त्या लढतीत केलेल्या द्विशतकी भागीदारीने सगळा नूरच पालटला. न्यूझीलंडविरुद्ध मिळवलेला हा विजय भारतीय संघासाठी स्पर्धेतील जबरदस्त टर्निंग पॉईंट ठरला. मग सेमीफायनलमध्ये आपली गाठ पडली ती बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी. स्पर्धेत अपराजित असलेल्या ऑस्ट्रेलियाची शिकार केली की, वर्ल्डकप आपलाच अशी गणितं अनेकांनी मांडली होती. पण हे काम एवढं सोपं नव्हतं. त्यात ऑस्ट्रेलियन संघाने ३३८ धावांपर्यंत मजल मारल्याने हे काम अधिकच कठीण झालं होतं. अशा कठीण समयी कर्णधार हरमनप्रीतने आघाडीवर राहून जबाबदारी स्वीकारली, तर जेमिमाने तिला उत्तम साथ दिली. मग दीप्ती, रिचा, अमनज्योत या भरवशाच्या रणरागीणींना छोट्या पण उपयुक्त खेळी करून ऑस्ट्रेलियानं दिलेलं हिमालयाएवढं आव्हान आरामात पार केलं आणि विश्वविजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं.

खरंतर भारतीय महिला संघ याआधी दोन वेळा विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र या दोन्ही वेळा विजेतेपदानं हुलकावणी दिली होती. २००५ साली भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत मुसंडी मारली होती. आफ्रिकेत असलेली स्पर्धा आणि समोर प्रतिस्पर्धी असलेला ऑस्ट्रेलियाचा महिला संघ असा योगायोग जुळून आल्याने आता २००३ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये पुरुष संघाच्या झालेल्या पराभवाचा महिला संघ वचपा काढेल, अशी भाबडी आशा होती. पण तुल्यबळ ऑस्ट्रेलियन संघासमोर भारतीय महिला संघाची मात्रा चालली नाही. त्या अंतिम लढतीत भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून ९८ धावांनी पराभूत व्हावे लागले. खरंतर तेव्हा भारतीय संघ फायनलपर्यंत पोहोचला हीच आश्चर्याची बाब मानली जात होती.  त्यानंतर सुमारे बारा वर्षांनी २०१७ साली भारतीय महिला संघाकडे महिला क्रिकेटचं अजिंक्यपद पटकावण्याची संधी पुन्हा एकदा चालून आली होती. इंग्लंडमध्ये झालेल्या त्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताची गाठ यजमान इंग्लंडशीच पडली. पण माफक आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या क्षणी दबाव झुगारण्यात अपयश आल्याने भारतीय संघाला अवघ्या ९ धावांनी पराभव पत्करावा लागला आणि वर्ल्डकप भारतीय महिला संघाच्या हातून निसटला. मात्र आपणही फायनलपर्यंत धडक मारू शकतो, हा विश्वास तेव्हा भारतीय महिला संघात निर्माण झाला. त्यानंतर मागच्या आठ वर्षांत भारतीय महिला संघानं खूप प्रगती केलीय.

त्यामुळे यावेळी भारताच्या लेकी अंतिम सामन्यात कुठलीही चूक करणार नाही, याची खात्री सर्वच क्रिकेटप्रेमींना होती. सगळ्यांच्याच नजरा नवी मुंपबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमकडे लागल्या होत्या. मात्र लढतीला सुरुवात होण्यापूर्वी सध्या सगळ्या महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसानं मोठं विघ्न आणलं. त्यामुळे हा सामना होतो की नाही अशी परिस्थिती होती. सामना झाला तरी काय परिस्थिती असेल, किती षटकांचा खेळ होईल, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. पण १५० कोटी भारतीयांची प्रार्थना आणि एका अविस्मरणीय लढतीचा आस्वास घेण्यासाठी चक्क वरुणराजानेही सुट्टी घेतली, त्यामुळे पहिल्या चेंडूपासून शेवटपर्यंत हा सामना अगदी कुठल्याही अडथळ्याविना पार पडला. बाकी सामन्याला सुरुवात झाल्यावर नाणेफेकीचा कौल तेवढा भारतीय संघाच्या विरोधात गेला, बाकी काहीच चुकीचं घडलं नाही. अगदी नशिबाने संधी दिलेल्या शेफाली वर्मा आणि फलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या स्मृती मंधानाने शतकी सलामी देत भक्कम सुरुवात करून दिली. त्यानंतर जेमिमा, हरमनप्रीत दीप्ती, अमनज्योत आणि रिचा घोष यांनी थोडं थोडं योगदान देत संघाला तीनशेच्या उंबरठ्यावर पोहोचवले. पण खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल असल्याने आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघात असल्याने ही धावसंख्या कमी पडेल की काय अशी धुकधुक होती. मात्र आपल्या गोलंदाजांनी या लढतीत स्पर्धेतील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. अंतिम लढतीचा दबाव दक्षिण आफ्रिकेच्या संघावर स्पष्टपणे दिसून आला. आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड एकाकी लढली. पण दुसऱ्या बाजूने तिला अपेक्षित साथ मिळाली नाही. भारतासाठी दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांनी चोख कामगिरी बजावत दक्षिण  आफ्रिकेच्या डावाला सुरुंग लावला. अखेरीस दीप्तीच्या गोलंदाजीवर नॅडिन डी क्लार्कने मारलेला फटका हरमनप्रीतने लीलया झेलला आणि बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा असलेला वर्ल्डकप भारतीय महिला संघाच्या हातात अलगद येऊन विसावला. त्याबरोबरच या महिला क्रिकेटपटूंपासून ते क्रिकेटप्रेमींपर्यंत सर्वांनी अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झालं. आता या विजयाच्या आणि विजयामागच्या अनेक कहाण्या समोर येतील. त्यातून प्रेरणा घेऊन भविष्यात अनेक स्मृती, जेमिमा, शेफाली, हरमनप्रीत, दीप्ती उभ्या राहतील. भारतीय महिला क्रिकेटला आणखी उंचीवर घेऊन जातील, ही बाब विश्वविजेतेपदापेक्षाही अधिक मोलाची आहे. मात्र हे केवळ क्रिकेटमध्येच घडू नये तर इतर खेळात रस असलेल्यांनीही भारतीय महिला क्रिकेट संघाकडून प्रेरणा घ्यावी आणि आपापल्या खेळाला वेगळ्या उंचीवर घेऊन जावे, हीच अपेक्षा.  

English
हिंदी सारांश
Web Title : Indian Women's Cricket Team Wins World Cup, Dreams Realized!

Web Summary : India's women's cricket team clinched their first World Cup title, defeating South Africa in a thrilling final. Smriti Mandhana and others played crucial roles, overcoming past defeats and inspiring future generations to excel in sports. A historic win!
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारतीय महिला क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ