भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात महिला क्रिकेट विश्वचषकाच्या २०२५ अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर २ नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, या दोन संघांपैकी जो कोणी जिंकेल, तो महिला क्रिकेट विश्वचषकावर पहिल्यांदाच आपले नाव कोरेल आणि आयसीसीला नवा विजेता मिळेल. त्यामुळे हा सामना'ऐतिहासिक' ठरणार आहे.
भारताचा अविश्वसनीय विजय
भारतीय संघाने उपांत्य फेरीत विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सने पराभूत करत अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना फोबी लिचफिल्ड (११९ धावा) शतकी खेळी आणि एलिस पेरी- अॅशले गार्डनर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ३३८ धावांचे विशाल लक्ष्य उभे केले. पण, भारतीय फलंदाजांनी हे आव्हान अत्यंत सहजपणे पार केले. युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने १३४ चेंडूत १२७ धावांची दमदार खेळी केली. तर, कर्णधार हरमनप्रीत कौरने ८९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर मोक्याच्या क्षणी रिचा घोषने २६ धावांच्या योगदान दिले. यामुळे सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला.
दक्षिण आफ्रिकेचा अंतिम फेरीत प्रवेश
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने उपांत्य फेरीत माजी विजेत्या इंग्लंडला तब्बल १२५ धावांनी दणदणीत पराभूत करत पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. दक्षिण आफ्रिकेच्या या ऐतिहासिक विजयामध्ये कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टच्या १६९ धावांच्या दमदार शतकी खेळीचा सिंहाचा वाटा आहे. लॉरा वोल्वार्ड्टच्या नेतृत्वाखालील संघाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रथमच स्थान मिळवून मोठा इतिहास रचला.
ऐतिहासिक लढाई
दरम्यान, २ नोव्हेंबर रोजी होणारा हा अंतिम सामना दोन्ही संघांसाठी केवळ क्रिकेट सामना नसून इतिहासात नोंद करण्याची मोठी संधी आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला हरवून आलेला आहे. तर, लॉरा वोल्वार्ड्टने जबरदस्त फॉर्म दाखवला आहे आणि त्यांच्या गोलंदाजांनी इंग्लंडला नमवले आहे. पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेला संघ कोणताही कसर सोडणार नाही.आता २ नोव्हेंबरला, भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांपैकी कोण 'नवा विश्वविजेता' बनणार, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.