ICC Womens World Cup 2025, Australia Women Won By 6 Wkts Against England : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील इंदूरच्या मैदानात रंगलेल्या २३ व्या सामन्यात गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लंडला पराभूत करत नंबर वनची लढाई जिंकली आहे. इंग्लंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात २४४ धावा करत ऑस्ट्रेलिन संघासमोर २४५ धावांचे टार्गेट सेट केले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. ६८ धावांवर ऑस्ट्रेलियन संघाच्या आघाडीच्या ४ बॅटर स्वस्तात तंबूत परतल्या होत्या. पण त्यानंतर ॲनाबेल सदरलँड ९८ (११२)* आणि ॲशली गार्डनर १०४ (७३)* जोडी जमली. दोघींनी ४१ व्या षटकातच संघाला पाचवा विजय निश्चित केला. या सामन्यातील विजयासह २ गुण खात्यात जमा करत ऑस्ट्रेलियन संघाने आपलं अव्वलस्थान भक्कम केले आहे.
जिचं शतक हुकलं तिच ठरली प्लेयर ऑफ द मॅच कारण...
महिला वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलच्या एका जागेसाठी ३ संघांमध्ये चुरस, भारतासाठी असं आहे समीकरण
संघ अडचणीत असताना ॲशली गार्डनर हिने दमदार फलंदाजीचा नजराणा पेश करत १६ चौकाराच्या मदतीने ७३ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या बाजूला ॲनाबेल सदरलँड हिने ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ९८ धावांची खेळी केली. तिचे शतक अवघ्या २ धावांनी हुकले. पण प्लेयर ऑफ द मॅच तिच ठरली. कारण गोलंदाजीत तिने १० चेंडूत ६० धावा खर्च करताना ३ विकेट्स घेतल्या होत्या.
इंग्लंडच्या ताफ्यातून टॅमी ब्युमाँटनं केली सर्वोच्च धावसंख्या
या सामन्यात टॉस गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडची सलामीची बॅटर टॅमी ब्युमाँट हिने १०५ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७८ धावांची खेळी केली. ॲलिस कॅप्सी ३८ (३२), चार्ली डीन २६ (२७), सोफिया डंकी २२ (४८) आणि कर्णधार हिदर नाइट २० (२७) या चौघींनी दुहेरी आकडा गाठला. पण एकीलाही चांगली सुरुवात मिळाल्यावर त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. परिणामी इंग्लंडचा संघ निर्धारित ५० षटकात २४४ धावांवरच अडखळला.