Join us  

टीम इंडियाचा विजयी चौकार, शफालीच्या फटकेबाजीने श्रीलंका गारद

श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 1:08 PM

Open in App

भारतीय महिलांच्या क्रिकेट संघाने ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यातच, आज झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या साखळी सामन्यातही भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सहज विजय मिळवला. महिला विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाचाहा हा चौथा विजय आहे. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेच्या संघाला 113 धावांत रोखले आहे.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण भारताच्या गोलंदाजांनी तिखट मारा करत त्यांना 113 धावांवर रोखण्यात यश मिळवले आहे. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूंवर श्रीलंकेला पहिला धक्का बसला. त्यानंतर त्यांनी सातत्याने आपले फलंदाज गमावले आणि त्यांना 120 धावांची वेसही ओलांडता आली नाही. श्रीलंकेच्या सात फलंदाजांना यावेळी दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. भारताकडून राधा यादवने चार, तर राजेश्वरी यादवने दोन फलंदाजांना बाद केले.

श्रीलंकेनं दिलेल्या 114 धावांचे आव्हान भारतीय संघाने 14.4 षटकांतच पूर्ण केले. विजयी घोडदौड करताना भारतीय संघाला 3 गडी गमावावे लागले. त्यामुळे भारताने श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय मिळवला. शफाली वर्माने शानदार फटकेबाजी करत 34 चेंडूत 47 धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे, भारताचा विजय सोपा झाला. मात्र, 47 धावांवर शफालीला धावबाद होऊन तंबूत परतावे लागले. तर स्मृती मानधना 17 आणि कर्णधार हरमनप्रीत कौर 15 धावांवर बाद झाल्या. अखेर, जेमीमाह रोड्रीगेस आणि दिप्ती शर्मा यांनी विजयी शेवट केला. या दोघींनीही 15-15 धावा करत टीम इंडियाच्या चौथ्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआयसीसी महिला टी२० विश्वचषकभारत विरुद्ध श्रीलंका