मेलबोर्न : उपांत्य फेरीत स्थान निश्चित करणारा भारतीय संघ महिला टी२० विश्वचषकात शनिवारी अ गटात अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भिडेल. यावेळी फलंदाजीतील उणिवा दूर करण्याचा प्रमुख प्रयत्न भारतीयांचा असेल. भारतीय संघ शानदार फॉर्ममध्ये असून गतविजेता ऑस्ट्रेलिया, बांगलादेश व न्यूझीलंडवर विजय नोंदवले. दुसरीकडे दोन पराभवांमुळे श्रीलंका संघ आधीच स्पर्धेबाहेर पडला.
भारतीय फलंदाज अखेरच्या साखळी सामन्यात फलंदाजीतील उणिवा दूर करण्याच्या प्रयत्न करतील. पहिल्या तिन्ही सामन्यात भारतीय संघ मोठ्या धावा उभारण्यात अपयशी ठरला होता. भारताची मधली फळी चांगल्या सुरुवातीनंतरही अपयशी ठरली. तिन्ही सामन्यात गोलंदाजांच्या जोरावरच भारताने विजय मिळवले.
फलंदाजीत आतापर्यंत युवा शेफाली वर्मावर भारतीय संघ विसंबून राहिला. यापुढे मात्र हरमनप्रीत आणि वेदा कृष्णमूर्तीसारख्या फलंदाजांना जबाबदारी स्वीकारावी लागेल. सलामीवीर स्मृती मानधनाही अपयशीच ठरली.
यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौरनेदेखील मधल्या फळीच्या अपयशावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. शेफालीच्या सुरुवातीच्या धावा संघासाठी संजीवनी ठरत असल्याचे तिचे मत आहे. त्याचवेळी, भारताची गोलंदाजी मात्र प्रभावशाली ठरली. (वृत्तसंस्था)