Join us

आयसीसी रॅंकिंग: लोकेश राहुल पहिल्यांदाच टॉप 10 मध्ये

श्रीलंकेविरोधातील कसोटी मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारतीय संघाचा सलामीवीर के.एल.राहुल करिअरच्या सर्वोच्च रॅंकिंगवर पोहोचला आहे.    

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 17:44 IST

Open in App
ठळक मुद्देश्रीलंकेविरोधातील कसोटी मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारतीय संघाचा सलामीवीर के.एल.राहुल करिअरच्या सर्वोच्च रॅंकिंगवर पोहोचला आहे.    श्रीलंकेच्या मालिकेपूर्वी 11 व्या क्रमांकावर असणा-या राहुलला सातत्यपूर्ण कामगिरीचा चांगलाच फायदा झाला आणि त्याने पहिल्यांदाच टॉप 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवलं

मुंबई, दि. 15 - कसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारून व्हाइटवॉश देणा-या भारतीय संघाने आयसीसी क्रमवारीत आपला दबदबा कायम ठेवला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत टीम इंडियाने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारतीय संघाचा सलामीवीर के.एल.राहुल करिअरच्या सर्वोच्च रॅंकिंगवर पोहोचला आहे.    

श्रीलंकेच्या मालिकेपूर्वी 11 व्या क्रमांकावर असणा-या राहुलला सातत्यपूर्ण कामगिरीचा चांगलाच फायदा झाला. त्याने पहिल्यांदाच टॉप 10 फलंदाजांमध्ये स्थान मिळवलं असून तो 9 व्या स्थानावर आला आहे. संघांच्या क्रमवारीमध्ये भारतीय संघाने अव्वल स्थान कायम राखलं असून लंकेचा संघ सातव्या क्रमांकावर कायम आहे. टीम इंडिया 125 रेटिंगसह पहिल्या स्थानावर कायम आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुस-या स्थानावर आहे. आफ्रिकेच्या संघापेक्षा भारत 15 अंकांनी पुढे आहे. आफ्रिकेच्या संघाचे 110 रेटिंग आहेत. 

टॉप 10 टेस्ट रॅंकिंगमध्ये भारताचे 4 फलंदाज -पल्लेकल कसोटीत 85 धावांची खेळी करणा-या राहुलला दोन स्थानांचा फायदा झाला असून तो 9 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. यासोबतच टीम इंडियाच्या 4 फलंदाजांनी आयसीसीच्या टॉप 10 रॅंकिंगमध्ये स्थान मिळवलं आहे. यामध्ये चेतेश्वर पुजारा (4), विराट कोहली (5), केएल राहुल(9) आणि अजिंक्य रहाणे (10) यांचा समावेश आहे. पांड्या-शमी-उमेश यादव यांना झाला फायदा-पल्लेकल कसोटीत ऑलराउंडर हार्दिक पांड्याने 96 चेंडूंमध्ये 108 धावांची खेळी केली. त्याचा त्याला चांगलाच फायदा झाला असून आयसीसी क्रमवारीत त्याने 45 स्थानांची झेप घेतली आहे. तो फलंदाजांच्या क्रमवारीत 68 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. करियरमधील त्याची ही बेस्ट रॅंकिंग आहे. याशिवाय जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला एका स्थानाचा फायदा झाला असून तो गोलंदाजांच्या क्रमवारीत 19 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. उमेश यादवलाही एका स्थानाचा फायदा झाला असून तो 21 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.  रवींद्र जडेजाच्या रॅंकिंगमध्ये घसरण-अष्टपैलूंच्या क्रमवारीत रविंद्र जडेजाची घसरण झाली आहे. त्याचं अव्वल स्थान पुन्हा एकदा बांगलादेशच्या शाकिब अल हसनने मिळवलं आहे. श्रीलंकेच्या मालिकेत तिस-या सामन्यात बंदीमुळे जडेजा खेळू शकला नव्हता, त्यामुळे एका गुणाचा फटका त्याला बसला आणि बांगलादेशच्या शाकिब अल हसनला त्याचा फायदा  झाला.   तरी गोलंदाजांच्या क्रमवारीत जडेजा क्रमांक एकवर कायम आहे.