भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर हस्तांदोलन न केल्यामुळे नाराज झालेल्या पाकिस्तानच्या संघाने यूएईविरुद्धच्या सामन्यापूर्वी नाट्यमय खेळ केला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या निलंबनाची मागणी केली. तसेच बहिष्काराचीही धमकी दिली. त्यामुळे पाकिस्तान आणि यूएई यांच्याील सामन्याला उशीर झाला. पीसीबीच्या बेजबाबदार वागणुकीमुळे आयसीसीने त्यांना ईमेल पाठवला आहे.
यूएईविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अनागोंदी कारभारामुळे सामना तब्बल तासभर उशीराने सुरू झाला. त्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नियम सर्रास पायदळी तुडवले गेले. यावर आता आयसीसी अॅक्शन मोडमध्ये असून, पीसीबीवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. आयसीसीने पीसीबीला पाठवण्यात आलेल्या इमेलमध्ये गैरवर्तन आणि अनेक नियमभंग झाल्याचा ठपका ठेवला.
सामन्यापूर्वी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन आणि कर्णधार सलमान अली आगा यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीचे चित्रीकरण करण्याची परवानगी पीसीबीच्या मीडिया मॅनेजर नईम गिलानी यांना देण्यात आली, हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. या बैठकीचा व्हिडीओ पाकिस्तानी पत्रकारांकडून व्हायरल करण्यात आला. आयसीसीच्या नियमानुसार, अशा बैठकींमध्ये मीडिया मॅनेजर्सना परवानगी नसते.
या प्रकरणामुळे आयसीसीकडून पीसीबीवर शिस्तभंगात्मक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. अलीकडे 'हस्तांदोलन' प्रकरणावरूनही वाद निर्माण केल्यानंतर, आता या नवीन प्रकरणावरून पीबीविरोधात शिस्तभंगात्मक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.