भारतीय क्रिकेट संघाने ८ मार्च रोजी अहमदाबादच्या मैदानावर इतिहास घडवत टी-२० विश्वचषक २०२६ च्या किताबावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत टीम इंडियाने विश्वविजेतेपदाचा दुष्काळ संपवला. मात्र, या ऐतिहासिक विजयाच्या जल्लोषात भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला आयसीसीने शिस्तभंगाच्या कारवाईचा दणका दिला आहे.
अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २५० पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची स्थिती खालावली होती. यादरम्यान, किवी फलंदाज डॅरिल मिशेल फलंदाजी करत असताना ही घटना घडली. अर्शदीप सिंग गोलंदाजी करत असताना मिशेलने एक चेंडू सरळ अर्शदीपच्या दिशेने मारला. चेंडू अडवल्यानंतर अर्शदीपने पाहिले की, मिशेल काही सेकंदांसाठी क्रीझच्या बाहेर आहे. अर्शदीपने चेंडू उचलून तातडीने स्टम्पच्या दिशेने फेकला. मात्र, हा चेंडू थेट डॅरिल मिशेलला लागला. या प्रकारामुळे मिशेल प्रचंड संतापला आणि मैदानात दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.
दरम्यान, परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने तत्काळ मध्यस्थी केली आणि मिशेलची समजूत काढली. पंचांनीही अर्शदीपला जवळ बोलावून तंबी दिली. सामना संपल्यानंतर अर्शदीप सिंगने खिलाडूवृत्ती दाखवत थेट डॅरिल मिशेलकडे जाऊन आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली, तरी आयसीसीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अर्शदीपचे हे कृत्य अयोग्य घोषित करत कारवाई केली. अर्शदीपला त्याच्या मॅच फीच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच अर्शदीपच्या खात्यात एक 'डिमेरिट पॉईंट' जोडण्यात आला आहे.
भारताचा ऐतिहासिक विजय
अर्शदीपवरील कारवाई वगळता संपूर्ण सामन्यात भारताचे वर्चस्व राहिले. फलंदाजीमध्ये भारतीय फलंदाजांनी २-५० पेक्षा अधिक धावा केल्या, तर गोलंदाजीमध्येही अचूक टप्प्यावर मारा करत न्यूझीलंडला मोठ्या फरकाने पराभूत केले. या विजयानंतर बीसीसीआयने खेळाडूंसाठी करोडो रुपयांची बक्षिसे जाहीर केली आहेत.