India vs England, 2nd Semi-Final : संजू सॅमसनच्या स्फोटक अर्धशतकासह शिवम दुबेसह अन्य फलंदाजांच्या हिटिंग पॉवरच्या जोरावर टीम इंडियाच्या धुरंधरांनी वानखेडेच्या मैदानात धावांची बरसात केली. नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ७ बाद २५३ धावा करत इंग्लंडसमोर विक्रमी २५४ टार्गेट सेट केले आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात भारतीय संघाने दुसऱ्यांदा २५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला. एवढेच नाही तर ही नॉकआउटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
अभिषेक शर्मा स्वस्तात परतला, पण...
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत नाणेफेक गमावल्यावर भारतीय संघाने धमाकेदार फलंदाजी केली. अभिषेक शर्माच्या रुपात भारतीय संघाने धावफलकावर २० धावा असतानाच पहिली विकेट गमावली. पण संजू सॅमसन याने ईशान किशनच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी ४५ चेंडूत ९७ धावांची दमदार भागीदारी करत इंग्लंडच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. ईशान किशन याने १८ चेंडूत २१६ च्या स्ट्राईक रेटसह ३९ धावांची खेळी केली.
चौथ्या क्रमाकावरील नवा प्रयोगही ठरला यशस्वी
ईशान किशन माघारी फिरल्यावर टीम इंडियाने शिवम दुबेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. हा प्रयोग यशस्वी ठरला. संजूसोबत त्याने तिसऱ्या विकेटसाठी २२ चेंडूत ४३ धावांची भागीदारी रचली. संजूचे शतक अवघ्या ११ धावांनी हुकले. पण ४२ चेंडूत ८९ धावा करत त्याने संघाकडून सर्वोच्च धावसंख्या करत इंग्लंडसमोर मोठा डोंगर उभारणारी खेळी साकारली. शिवम दुबेनं धावबाद होऊन परतण्याआधी २५ चेंडूत ४३ धावांची धमाकेदार खेळी साकारली. अखेरच्या षटकात तिलक वर्मासह हार्दिक पांड्याचा जलवा पाहायला मिळाला. तिलकनं फक्त ७ चेंडूत २१ धावा कुटल्या. हार्दिक पांड्याने १२ चेंडूत २७ धावांची खेळी करत टीम इंडियाला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्यांदा २५० धावांचा आकडा पार करुन दिला.