ICC T20 World Cup 2026, Sri Lanka Register Largest Margins Win Against Oman : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १६ व्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने ओमानविरुद्धची २०० पार धावसंख्येची लढाई १०५ धावांनी जिंकत यंदाच्या हंगामातील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयासह श्रीलंकेच्या संघाने 'ब' गटात ४ गुणांसह अव्वलस्थानी झेप घेतली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने तीन अर्धशतकवीरांच्या जोरावर २२५ धावा करत ओमानच्या संघासमोर २२६ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना ओमानच्या संघाकडून फक्त दोघांनी दुहेरी आकडा गाठता आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ओमानकडून पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूचा 'ओल्ड इज गोल्ड' शो
पाकिस्तानी वंशाच्या मोहम्मद नदीम याने ५६ चेंडूत नाबाद ५३ धावांची खेळी केली. त्याची ही खेळी ओमानच्या संघाला जिंकून देऊ शकली नसली तरी या खेळाडूच्या नावे खास रेकॉर्डची नोंद झाली आहे. यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या हंगामातील तो सर्वात वयस्कर खेळाडू आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी या स्पर्धेत अर्धशतक झळकवण्याचा खास विक्रमही त्याने आपल्या नावे केला आहे. ४ सप्टेंबर १९८२ मध्ये पाकिस्तानच्या सियालकोट येथे जन्मलेल्या या क्रिकेटरनं वयाच्या १० व्या वर्षांपासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पाकिस्तानी क्रिकेटमध्ये संधी मिळणं अवघड आहे, हे लक्षात आल्यावर त्याने ओमानचा रस्ता धरला अन् सध्या्च्या घडीला तो या संघातील प्रमुख खेळाडू आहे.
SL vs Oman, T20 World Cup 2026: तीन अर्धशतकवीर! ओमानविरुद्ध श्रीलंकेनं 'द्विशतका'सह साधला विक्रमी डाव
श्रीलंकेकडून गोलंदाजीत तीक्षणासह चमिराने घेतल्या प्रत्येकी २ विकेट्स
श्रीलंकेच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मोहम्मद नदीम याने केलेल्या अर्धशतकाशिवाय वासीम अली याने २० चेंडूत केलेल्या २७ धावांची खेळी वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी निर्धारित २० षटकात ओमानच्या संघाला ९ विकेट्सच्या मोबदल्यात १२० धापांपर्यंतच मजल मारता आली. श्रीलंकेच्या संघाकडून दुश्मंथा चमिराने १ षटकात १९ धावा खर्च करून २ विकेट्स घेतल्या. महिश तीक्षणा याने ४ षटकात फक्त ११ धावा खर्च करत २ विकेट्सचा डाव साधला. याशिवाय दिनुथ वेलिंगे. दुशान हेमंथा आणि कुसल मेंडिस यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.