ICC T20 World Cup 2024 IND vs PAK Live Scorecard - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महामुकाबला भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या लढतीत पावसाने व्यत्यय आणला... IND vs PAK लढतीची क्रेझ काय आहे, हे अमेरिकेला दाखवून देण्यासाठी चाहतेही मोठ्या संख्येने न्यूयॉर्कच्या स्टेडियमवर येऊ लागले आहेत. या एका सामन्यावर ICC चे बरेचसे आर्थिक गणित अवलंबून असल्याने कोणत्याही परिस्थितीत सामना यशस्वी करण्यासाठी ते सज्ज आहेत. अमेरिकेकडून या सामन्याला अभुतपूर्व सुरक्षा पुरवली गेली आहे... सैन्याचे हेलिकॉप्टर सुरक्षेची खातरजमा करण्यासाठी स्टेडियमवभवती घिरट्या मारत आहेत. दोन्ही संघांना कडक बंदोबस्तात स्टेडियमवर आणण्यात आले आहे.
पण, येथे पाऊस सुरू झाला आहे आणि त्यामुळे खेळपट्टी झाकली गेली आहे. त्यामुळे कदाचित नाणेफेकीला विलंब होऊ शकतो. पण, खेळपट्टीसोडून संपूर्ण मैदान झाकलं न गेल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले गेले आहे. कारण, स्टेडियमवर ड्रेनेज सिस्टमही नाही आणि अशात मैदान भिजल्यावर खेळाडूंना दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारताने आतापर्यंत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सातपैकी सहा सामन्यांत बाजी मारली आहे. भारताने पहिल्या सामन्यात आयर्लंडवर विजय मिळवून दमदार सुरुवात केली आहे, तेच पाकिस्तानला नवख्या अमेरिकेकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे.

पावसामुळे नाणेफेकीला विलंब झाला आहे. दरम्यान, महान फलंदाज ख्रिस गेल दोन्ही संघांच्या खेळाडूंची भेट घेताना दिसला आणि त्याने त्याच्या सफेद कोटवर खेळाडूंची स्वाक्षरीही घेतली. पाकिस्तानविरुद्ध विराटने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ३०८ धावा केल्या असल्याने आजही त्याच्यावर सर्वांचे लक्ष आहे. ७.४५ वाजता खेळपट्टीवरील कव्हर्स हटवण्यात आले आणि अम्पायर्सनी खेळपट्टीची पाहणी केली. ८ वाजता टॉस होणार असून ८.३० वाजता मॅच सुरू होणार आहे आणि संपूर्ण २०-२० षटकं खेळवली जाणार आहेत.