IND vs PAK Ishan Kishan On Shaheen Afridi : कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर महाशिवरात्रीच्या रात्री पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात ईशान किशनचं तांडव पाहायला मिळाले. भारतीय संघाने पहिल्या षटकात विकेट गमावल्यावरही न डगमगता ईशान किशनने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत पाकिस्तानी गोलंदाजांना धु धु धुतलं. ४० चेंडूत ७७ धावांची शानदार खेळी करणारा ईशान किशनच या सामन्यात सामनावीरही ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ईशान किशनने काढली पाकिस्तानी गोलंदाजाची लायकी?
भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज असलेल्या शाहीन शाह आफ्रिदीची चांगलीच धुलाई झाली. फक्त २ षटके टाकताना त्याने १ विकेटच्या मोबदल्यात त्याने ३१ धावा खर्च केल्या. यात भारताच्या डावातील दुसऱ्या षटकात ईशान किशन याने त्याचे षटकार मारून स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. मैदानात धुलाई केल्यावर सामन्यात ईशान किशन याने शाहीन शाह आफ्रिदीची लायकी काढली. नेमकं ईशान किशन काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर
IND vs PAK : ईशान किशनसह ५ धुरंधरांचा जलवा; पाकिस्तानवर पुन्हा एकदा आली तोंडावर पडण्याची वेळ!
भारत-पाकिस्तान सामना खास असतो, कारण...
सामनावीर पुरस्कार स्विकारताना ईशान किशन म्हणाला की, "सुरुवातीला विकेट तितकीशी सोपी नव्हती. अशा वेळी स्वतःवर विश्वास ठेवणे आणि आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे होते. मी माझ्या ऑफ-साइड खेळावर खूप मेहनत घेतली आहे. मी खेळ साधा ठेवण्याचा प्रयत्न केला. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना नेहमीच खास असतो. फक्त आमच्यासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी. पाकिस्तानविरुद्धचा हा विजय आम्हाला पुढील सामन्यांसाठी मोठा आत्मविश्वास देईल,” असेही तो म्हणाला.
आफ्रिदीच्या बॉलिंगबद्दल नेमकं काय म्हणाला ईशान किशन?
ईशान किशन याने सामन्यानंतर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याने सुरुवातीच्या षटकात केलेल्या गोलंदाजांचे कौतुक करताना शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीतील उणीव सांगितली. तो म्हणाला की, "शाहीन अफ्रिदी गोलंदाजी करत असताना पिचवरून फारशी मदत मिळत आहे असे वाटले नाही. पण हार्दिक आणि बुमराह यांनी त्या दोन षटकांत ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ते अविश्वसनीय होते." हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात विकेट घेतली, तर पुढच्या षटकात बुमराहने दोन बळी घेत पाकिस्तानची कंबर मोडली होती.