नवी दिल्ली : श्रीलंकेत मागच्या वर्षी याच दिवशी ईस्टरदरम्यान बॉम्बस्फोट झाला होता. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी झाखेचे अधिकारी स्टीव्ह रिचर्डसन ज्या सिनेमन ग्रॅन्ड हॉटेलमध्ये वास्तव्यास होते, त्या दिवशीच्या घटनेला उजाळा देताना त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला.
श्रीलंका क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आलेले रिचर्डसन कोलंबोस्थित या हॉटेलच्या नवव्या माळ्यावरील एक्झिक्युटिव्ह लॉऊंजमध्ये नाश्ता घेत होते. या दिवशी एकूण सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले. त्यात शेकडो जणांना प्राण गमवावे लागले. ‘आम्ही अनेक दिवसांपासून येथे वास्तव्यास होतो, मात्र त्या दिवशी नाश्ता करण्यासाठी खाली न जाण्याचा निर्णय घेतला. नेमका त्याचवेळी बेसमेंटच्या रेस्टॉरंटमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट झाला. खाण्याचे पदार्थ घेतल्यानंतर टेबलकडे परत येत असताना धाडधूम आवाज झाला. इमारत हलली. सर्वत्र धुळीचे लोट दिसू लागले. मी खिडकीतून खाली पाहिले तेव्हा जलतरण कक्षाच्या ट्रेनरने स्वत:चे कान झाकले केले होते. इमारत पडेल की काय, अशी शंका मनात येत होती. जखमींना रिक्षा, कार किंवा मिळेल त्या वाहनांनी इस्पितळाकडे पोहोचवण्यात येत होते.’ (वृत्तसंस्था)