ICC ODI World Cup SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या ४२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या कुसल मेंडिसने वादळी फटकेबाजी केलेली पाहायला मिळतेय...

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय श्रीलंकेचा चांगलाच महागात पडला. रॅसी व्हॅन डेर ड्युसेन आणि सलामीवीर क्विंटन डी कॉक या जोडीने १७४ चेंडूंत २०४ धावांची भागीदारी केली. क्विंटन ८४ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०० धावांवर झेलबाद झाला. डेर ड्युसेन ११० चेंडूंत १३ चौकार व २ षटकारांसह १०८ धावांवर बाद झाला. एडन मार्करमने ४९ चेंडूंत शतक पूर्ण करून इतिहास रचला. तो ५४ चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १०६ धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेने आज ५ बाद ४१९ धावा चोपल्या आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानविरुद्ध ६ बाद ४१७ धावा केल्या होत्या. त्याआधी भारताने २००७मध्ये बर्म्युडाविरुद्ध ५ बाद ४१३ धावा केल्या होत्या.
फलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर श्रीलंकेकडून दमदार सुरुवातीची अपेक्षा होती, परंतु पथूम निसंका ( ०) मार्को यानसेनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. कुसल मेंडिसने ५व्या षटकात ३ खणखणीत षटकार खेचून श्रीलंकेच्या चाहत्यांना खूश केले. त्याने २५ चेंडूंत अर्धशतक झळकावताना ३ चौकार व ६ षटकार खेचले. कागिसो रबाडाला गोलंदाजीला आणले आणि कुसल परेरा मारलेला चेंडू जागच्या जागी उडाला. पण, टेम्बा बवुमा आणि डेव्हिड मीरल यांच्यात संयम न दिसल्याने झेल दोघांच्या मधे पडला. वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकन फलंदाजाचे हे तिसरे वेगवान अर्धशतक ठरले. अँजेलो मॅथ्यूजने २० चेंडूंत स्कॉटलंडविरुद्ध ( २०१५) आणि दिनेश चंडिमलने २२ चेंडूंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ( २०१५) वेगवान अर्धशतक ठोकले होते.