ICC ODI World Cup PAK vs SL Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्या विजयाच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानची हैदराबादमध्ये धुलाई झाली. पथूम निसांकानंतर कुसल मेंडिसने पाकिस्तानी गोलंदाजांना चोपून काढले. त्याने अवघ्या ६५ चेंडूंत शतक पूर्ण करताना विक्रमाला गवसणी घातली.
चेंडू हातात होता, पण श्रीलंकेचा फलंदाज चतूर निघाला; पाकिस्तानचा 'पोपट'झाला

हसन अलीने दुसऱ्याच षटकात सलामीवीर कुसल परेराला ( ०) माघारी पाठवले. शाहीन आफ्रिदीचा फॉर्म आजही हरवलेला दिसला आणि त्याच्या हातातून एक झेलही सुटला गेला. इमाम उल हकनेही सातव्या षटकात कुसल मेंडिसला जीवदान दिले. ९व्या षटकात फिरकीपटू मोहम्मद नवाझला आणि १०व्या षटकात हॅरी रौफला गोलंदाजीला आणले. पण, मेंडिस आणि पथूम निसांका यांनी चांगले फटके लगावले. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून श्रीलंकेचा डोलारा पुन्हा उभा केला. १८व्या षटकात शादाबच्या गोलंदाजीवर निसांका ५१ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. निसांका आणि मेंडिस यांच्यातील १०२ धावांची भागीदारी ही वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेकडून झालेली सर्वोत्तम ठरली. यापूर्वी दिनेश मेंडिस व अर्जुन रणतुंगा यांनी १९८७मध्ये फैसलाबाद येथे ८० धावा जोडल्या होत्या.
मेंडिस आणि सदीरा समराविक्रमा यांनीही धावांचा तो ओघ कायम राखला. हॅरिसला पूल शॉटने सदीराने मारलेले दोन षटकार अप्रतिम होते.४ षटकांची पहिली स्पेल टाकून पुन्हा गोलंदाजीला आलेल्या शाहीनचे २५ षटकात मेंडिसने ४,४,४ असे स्वागत केले. मेंडिसने ६५ चेंडूंत १३ चौकार व ४ षटकार खेचून शतक पूर्ण केले. वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकेच्या फलंदाजानी केलेले हे वेगवान शतक ठरले. त्याने कुमार संगकाराचा २०१५च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील ( ७० चेंडू वि. इंग्लंड) विक्रम मोडला.