ICC ODI World Cup PAK vs SA Live : ५ सामन्यांत ३ पराभवामुळे अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानचा संघ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत आव्हान टीकवण्यासाठी संघर्ष करतोय. फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा आज पराभव झाल्यास त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे आज त्यांच्याकडून दमदार खेळाची अपेक्षा होती, परंतु सलामीवीरांनी पुन्हा पाट्या टाकल्या. मार्को यानसेनच्या भेदक माऱ्यासमोर दोन्ही सलामीवीर माघारी परतल्याने पाकिस्तानी रडीचा डाव खेळायला लागले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मोहम्मद रिझवान दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजासोबत भांडायला लागला.
आफ्रिकेने १९९९मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत ( वन डे व ट्वेंटी-२०) शेवटचं पाकिस्तानला पराभूत केले होता आणि त्यानंतर सहा सामन्यांत त्यांची हार झाली आहे. पण, यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील आफ्रिकेचा संघ सुसाट फॉर्मात आहे. पाकिस्तानला प्रत्येक सामना जिंकणे गरजेचा आहे आणि आज त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. कर्णधार बाबर आजमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर अब्दुल्लाह शफिक ( ९) पाचव्या षटकात मार्को यानसेनचा शिकार ठरला. पुढच्या षटकात यानसेनने पाकिस्तानला आणखी एक धक्का दिला आणि इमाम-उल-हक ( १२) झेलबाद झाला.
मार्को यानसेनच्या पुढच्याच चेंडूवर रिझवान बाद झाला असता. रिझवानने सरळ मारलेला चेंडू टीपण्यासाठी यानसेनने हवेत झेप घेतली, पण सुदैवाने पाकिस्तानी खेळाडू वाचला. त्यानंतर रिझवान आणि यानसेन यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
गुणतालिकेचे चित्र...
भारतीय संघ ५ विजय व १० गुणांसह आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड प्रत्येकी ८ गुणांसह आणि ऑस्ट्रेलिया ६ गुणांसह टॉप फोअरमध्ये आहे. आजपर्यंत सर्वच संघांचे ५ सामने झाले आहेत. पाकिस्तान, अफगाणिस्तान व श्रीलंका हे ४ गुणांसह अजूनही शर्यतीत आहेत. इंग्लंड, बांगलादेश व नेदरलँड्स यांना ५ पैकी १ सामना जिंकता आल्याने त्यांचे आव्हान संपल्यात जमा आहे. आता ते इतरांचे गणित बिघडवण्याचे काम करू शकतात.