Join us

६ बाद १४ धावा! बुमराहने इतिहास रचला, सिराज व शमी यांनी श्रीलंकेला घाम फोडला, Video  

ICC ODI World Cup IND vs SL Live : भारतीय गोलंदाजांना जगात घातक का म्हटले जाते, याची प्रचिती वानखेडे स्टेडियमवर आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 19:45 IST

Open in App

ICC ODI World Cup IND vs SL Live : भारतीय गोलंदाजांना जगात घातक का म्हटले जाते, याची प्रचिती वानखेडे स्टेडियमवर आली. जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेला धक्का दिला आणि इतिहास रचला. त्यानंतर मोहम्मद सिराजने पुढील षटकांत पाहुण्यांना घाम फोडला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग १३ सामन्यांत विकेट्स घेत बुमराहने झहीर खानचा ( २००७- २०११) विक्रम मोडला. श्रीलंकेच्या आघाडीच्या ४ फलंदाजापैकी ३ शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ ठरली. २००३ मध्ये भारतानेच अटापट्टू, मुबारक व माहेला जयवर्धने यांना भोपळ्यावर बाद केले होते. बुमराह व सिराजनंतर मोहम्मद शमीने त्याच्या पहिल्या षटकात दोन विकेट्स घेतल्या. 

विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या फटकेबाजीने वानखेडे स्टेडियम दणाणून निघाले. या तिघांची शतकं अगदी थोडक्यात हुकल्याने स्टेडियममधील प्रेक्षक नाराज झाले होते. पण, एकामागून एक तिघांनी खणखणीत फटकेबाजी करून भारताला ८ बाद ३५७ धावांपर्यंत पोहोचवले. विराट व शुबमन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १८९ धावांची भागीदारी करून श्रीलंकेला हतबल केले.  शुबमन ९२ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९२ धावांवर आणि विराट ९४ चेंडूंत ११ चौकारांसह ८८ धावांवर बाद झाला.  

लोकेश राहुल ( २१) व श्रेयस अय्यर यांनी ४७ चेंडूंत ६० धावा जोडल्या. सूर्यकुमार यादवने ( १२) आज पुन्हा निराश केले. श्रेयसने ५६ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह ८२ धावांची वादळी खेळी केली आणि रवींद्र जडेजासह ३६ चेंडूंत ५७ धावा जोडल्या.  जडेजाने २४ चेंडूंत ३५ धावा करून भारताला ८ बाद ३५७ धावांपर्यंत पोहोचवले. वर्ल्ड कप स्पर्धेत एकही वैयक्तिक शतक न होता एखाद्या संघाकडून झालेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी २०१९मध्ये पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध ८ बाद ३४८ धावा केल्या होत्या. 

जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा सलामीवीर पथूम निसंकाला भोपळ्यावर पायचीत केले. वर्ल्ड कप स्पर्धेच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्यानंतर मोहम्मद सिराजने ३ धक्के दिले. श्रीलंकेची अवस्था ४ बाद ३ धावा अशी दयनीय झाली. सिराजने श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारत्नेला शून्यावर पायचीत केले. भारताने पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाच्या दोन्ही सलामीवीरांना शून्यावर बाद केले. कर्णधार कुसल मेंडिस ( १) व सदीरा समराविक्रमा ( ०) यांनाही सिराजने माघारी पाठवले. मोहम्मद शमीच्या २ विकेट्सने श्रीलंकेची अवस्था ६ बाद १४ अशी झाली. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपजसप्रित बुमराहभारत विरुद्ध श्रीलंकामोहम्मद शामीमोहम्मद सिराज