ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : विराट कोहली ( Virat Kohli) आणि शुबमन गिल यांच्या फटकेबाजीने वानखेडे स्टेडियम दणाणून निघाले... रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर निराश झालेल्या चाहत्यांना विराट-शुबमन यांनी खूश केले. या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि शतकी भागीदारी करून धावांचा डोंगर उभा केला. श्रीलंकेने या दोघांना सुरुवातीला दिलेले जीवदान महागात पडले. ज्या वानखेडे स्टेडियमवरून महान फलंदाज सचिन तेंडुलकर घडला, त्याच मैदनावर विराट ४९व्या शतकाच्या जवळ पोहोचला होता. सारे उत्सुक होते, परंतु घात झाला.
कर्णधार रोहित शर्मा ( ४) दुसऱ्याच चेंडूवर त्रिफळाचीत झाल्यानंतर विराट कोहलीच्या ( Virat Kohli) जयघोषाने वानखेडे दणाणून निघाले. सावध सुरूवातीनंतर विराटच्या बॅटीतून धावांचा ओघ सुरू झाला आणि त्याने शुबमन गिलसह दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण केली. आशिया खंडात वन डेत ८०००+ धावा करणारा विराट चौथा फलंदाज ठरला आणि त्याने २०२३ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये १००० धावांचा टप्पा आज ओलांडला. कॅरेंडर वर्षात सर्वाधिक ८ वेळा विराटने १०००+ धावा.
श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटने ( ४००२*) दुसरे स्थान पटकावताना इंझमान-उल-हक ( ३८२४) मागे टाकले. सचिन ५१०८ धावांसह टॉपर आहे. शुबमन आणि विराट यांच्यात पहिलं शतक कोण झळकावतो याची शर्यत लागलेली आणि युवा फलंदाज वर्ल्ड कपमधील पहिल्या शतकाच्या जवळ पोहोचला होता. पण, ३०व्या षटकात मधुशंकाच्या बाऊन्सरवर अपर कट मारण्याचा प्रयत्न फसला अन् चेंडू बॅटची किनार घेत यष्टिरक्षक कुसल मेंडिसच्या हाती विसावला. शुबमन ९२ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९२ धावांवर बाद झाला आणि विराटसह त्याची १८९ धावांची भागीदारी संपुष्टात आली. आता सर्वांना विराटच्या शतकाची आतुरतेनं प्रतीक्षा होती, परंतु मधुशंकाने सोव्हर बाऊन्सर टाकून विराटला बाद केले. विराट ९४ चेंडूंत ११ चौकारांसह ८८ धावांवर बाद झाला.