ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : रोहित शर्मा मैदानावर असेपर्यंत टीम इंडियाने पहिल्या १० षटकांत ८० धावा कुटल्या होत्या. पण, हिटमॅन बाद झाला अन् ऑस्ट्रेलियाने फास आवळला.. विराट कोहली व लोकेश राहुल यांनी अर्धशतक झळकावले, परंतु धावांची गती संथच होती. सूर्यकुमार यादवच्या जागी आज रवींद्र जडेजाला पुढच्या क्रमांकावर पाठवले. त्याने लोकेशसह जोडी जमवली होती, परंतु चुकीच्या फटक्याने त्याची विकेट पडली.
शूsssss! पॅट कमिन्सनं त्याचा शब्द खरा केला, विराट कोहलीचा त्रिफळा उडवला, Video
रोहित शर्माने ( ४७) भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. पण, शुबमन गिल ( ४) व श्रेयस अय्यर ( ४) यांनी आज निराश केले. ट्रॅव्हिस हेडने परतीचा अविश्वसनीय झेल घेऊन रोहितला माघारी जाण्यास भाग पाडले. नरेंद्र मोदी स्टेडियम एकदम चिडीचूप झाले. ५ चेंडूंत २ विकेट्स गेल्याने भारताचा रन रेट खाली आला. त्यानंतर पहिल्या चौकारासाठी भारतीयांना ९७ चेंडू खेळून काढावी लागली. या दोघांनी १०९ चेंडूंत ६७ धावांची भागीदारी केली, परंतु पॅट कमिन्सची नजर लागली. त्याच्या स्लोव्हर बाऊन्सरील चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने टोलावलण्याच्या प्रयत्नात विराट त्रिफळाचीत झाला. अनुष्का शर्माही नाराज झाली.

विराट ६३ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ५४ धावांवर बाद झाला. भारताला १४८ धावांवर चौथा धक्का बसला. विराटने या वर्ल्ड कपमध्ये ११ सामन्यांत ९५.६२च्या सरसरीने ७६५ धावा कुटल्या. विराटनंतर लोकेशने जबाबदारीने खेळ करताना ८६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. लोकेशने पाचव्या विकेटसाठी रवींद्र जडेजाला सोबत घेऊन भारताचा डाव सावरला. या दोघांमधील रनिंग बिटवीन विकेटनंतर ऑस्ट्रेलियाला गोंधळात टाकले. ३६व्या षटकात जोश हेझलवूडने DRS घेतला, परंतु जडेजाच्या बॅटचा अन् चेंडूचा संपर्क न झाल्याचे दिसले. प्रेक्षकांनी जल्लोष केला अन् अनुष्का, अथिया, रिवाबा टाळ्या वाजवू लागल्या. अश्विनच्या पत्नीने शिटी वाजवण्याची अॅक्टिंग केली. पण, हेझलवूडने पुढच्याच चेंडूवर जडेजाला त्याच प्रकारे बाद केले. जडेजा ९ धावांवर ( २२ चेंडू) यष्टिरक्षक जोश इंग्लिसच्या हाती झेल देऊन बाद झाला.