Womens World Cup 2025 : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यातील पराभवानंतर मोठा धक्का बसला. आयसीसीने टीम इंडियावर 'स्लो ओव्हर-रेट'साठी दंड ठोठावला आहे. या पराभवामुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीत भारताचे आव्हान अधिक कठीण झाले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात भारतीय महिला संघ निर्धारित वेळेपेक्षा एक ओव्हर मागे होता. त्यामुळे, आयसीसीने त्यांच्या आचारसंहितेनुसार (कलम २.२२) टीम इंडियाला दंड ठोठावला आहे. मॅच रेफरी मिशेल परेरा यांनी दिलेल्या निर्णयानुसार, भारतीय खेळाडूंना त्यांच्या मॅच फीच्या ५ टक्के दंड भरावा लागणार आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने आपली चूक मान्य केल्यामुळे या प्रकरणात कोणतीही औपचारिक सुनावणी घेण्यात आली नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर ४८.५ षटकांत ३३० धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीने वादळी फलंदाजी करत १०७ चेंडूत १४२ धावांची धडाकेबाज खेळी केली. तिच्या या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने हे ३३१ धावांचे लक्ष्य ४९ षटक आणि तीन विकेट्स राखून पूर्ण केले.
भारताला उर्वरित सामने जिंकणे अनिवार्य
चार सामन्यांपैकी दोन विजय आणि दोन पराभवांसह टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर आहे आणि त्यांचे एकूण ४ गुण आहेत. या पराभवानंतर, टीम इंडियाला उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी आता त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकणे अनिवार्य झाले आहे. ऑस्ट्रेलिया संघ सध्या चार सामन्यांमध्ये ७ गुणांसह (३ विजय आणि १ सामना पावसामुळे रद्द) पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडिया आता आपला पुढील महत्त्वाचा सामना १९ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे.