Join us  

...तर भारताच्या उपांत्य लढतीचं ठिकाण बदलणार? मुंबईऐवजी या ठिकाणी सामना खेळवला जाणार

ICC CWC 2023, Team India: ८ विजयांसह एकूण १६ गुण असल्याने भारतीय संघ पहिल्या स्थानावर राहणार हे निश्चित आहे. त्यामुळे भारतीय संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात खेळणार आहे. मात्र हा उपांत्य सामना मुंबईतून दुसऱ्या ठिकाणी हलवला जाण्याची दाट शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 1:21 PM

Open in App

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडियाने सलग ८ सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. ८ विजयांसह एकूण १६ गुण असल्याने भारतीय संघ पहिल्या स्थानावर राहणार हे निश्चित आहे. त्यामुळे भारतीय संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यात खेळणार आहे. मात्र हा उपांत्य सामना मुंबईतून दुसऱ्या ठिकाणी हलवला जाण्याची दाट शक्यता आहे. जर पाकिस्तानच्या संघाने उपांत्य फेरी गाठली आणि क्रमवारीत चौथे स्थान पटकावले तर उपांत्य फेरीचं ठिकाण हे बदललं जाईल. त्याला कारणही तसंच आहे. 

ते कारण म्हणजे २००८ साली मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला हे आहे. त्या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. तसेच दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून तीन दिवस केलेल्या नंगानाचामध्ये शेकडो मुंबईकरांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका बंद पडल्या आहेत. तसेच जर उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार असतील, तर हा सामना मुंबईत आयोजित केल्यास त्याला विरोध होऊ शकतो. त्यामुळे हा सामना मुंबईऐवजी कोलकाता येथे आयोजित करण्यात येऊ शकतो. बीसीसीआय आणि आयसीसीने कुठलाही वाद टाळण्यासाठी याबाबतचा निर्णय आधीच घेतलेला आहे. 

दरम्यान, क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील साखळी लढतींचे सामने हे १२ नोव्हेंबर रोजी संपणार आहेत. गुणतक्त्यामध्ये पहिल्या ४ क्रमांकावर राहणारे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर तर दुसरा उपांत्य सामना हा १६ नोव्हेंबर रोजी कोलकातामधील ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. तर अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. यात गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर राहणारा संघ चौध्या क्रमांकावरील संघाशी भिडणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर राहणारा संघ तिसऱ्या क्रमांकावरील संघाशी दोन हात करेल.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध पाकिस्तान