नवी दिल्लीः इंग्लंडमध्ये होऊ घातलेल्या आगामी वर्ल्ड कप 2019साठी नऊ देशांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. त्यामुळेच सर्वच क्रिकेट प्रेमींना वेस्ट इंडियच्या टीममध्ये कोणाकोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागून राहिली होती. त्या क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. कारण वेस्ट इंडिजनं आपल्या संघाची घोषणा केली आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानं विश्वचषकासाठी घोषित केलेल्या संघात पाच नव्या खेळाडूंना स्थान दिलं आहे. या खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषकासाठी खेळण्याची संधी मिळणार आहे. वेस्ट इंडिजच्या संघाचं नेतृत्व जेसन होल्डर करणार आहे. आयपीएलमध्ये शानदार खेळीचं प्रदर्शन करणाऱ्या आंद्रे रसेललाही या 15 सदस्यांच्या संघात स्थान मिळालं आहे. रसेल वेस्ट इंडिजसाठी शेवटचा एकदिवसीय सामना जुलै 2018मध्ये खेळला होता. 33 वर्षीय आंद्रे रसेलनं सध्याच्या आयपीएलमध्ये स्वतःच्या कामगिरीनं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. आयपीएलमध्ये रसेलनं 9 सामन्यांमध्ये 218 स्ट्राइक रेटनं 392 धावा कुटल्या आहेत.
इंग्लंडविरोधात चांगली खेळी करणारा गोलंदाज शेल्डन कोट्रेललाही विश्व कपसाठीच्या संघात संधी देण्यात आली आहे. वेगवाग गोलंदाजी करणाऱ्यांमध्ये कोट्रेलबरोबरच केमार रोच, जेसन होल्डर दिसणार आहेत. तर आयपीएलमध्ये खेळलेल्या पाच जणांना या संघात स्थान मिळालं आहे. ब्रॅथवेट, गेल, हेटमायर, रसेल, पूरन ही पंचरत्न वर्ल्ड कपसाठीच्या संघात खेळणार आहेत.
ही आहे वेस्ट इंडिजची 15 सदस्यीय टीमजेसन होल्डर (कर्णधार), आंद्रे रसेल, एश्ले नर्स, कार्लोस ब्रेथवेट, क्रिस गेल, डॅरेन ब्रावो, एविन लुइस, फॅबियन एलेन, कीमर रोच, निकोलस पूरन, ओशाने थॉमस, शाई होप, शैनन गॅब्रियल, शेल्डन कोटरेल, शिमरॉन हेटमेयर