Fakhar Zaman Injured : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना कराची येथील नॅशनल स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्याला सुरुवात झाल्यावर काही क्षणातच पाकला एक मोठा धक्का बसला आहे. कारण एक धाव वाचवण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा स्टार बॅटर फखर झमान हा दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले. सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू त्याने अडवला पण त्याच्यावर मात्र बाहेर जाण्याची वेळ आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर पाकचा स्टार बॅटरला दुखापत
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने नाणेफे जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या संघाने अगदी संयमीरित्या डावाला सुरुवात केली. पहिल्याच षटकात क्षेत्ररक्षण करतावेळी फखर झमान दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले. सीमारेषेच्या दिशेनं जाणारा चेंडू त्याने पळत जाऊन अडवला आणि एक धावही वाचवली. पण स्नायू दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेर डाण्याची वेळ आली. पहिल्या सामन्यातील न्यूझीलंड विरुद्धच्या डावातील दुसऱ्याच षटकात हे घडलं.
नेमकं काय घडलं?
पहिल्यांदा गोलंदाजी करताना पाकिस्तान संघानं शाहीन शाह आफ्रिदीच्या षटकानं सामन्याला सुरुवात केली. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विल यंगनं एक्स्टा कव्हरच्या दिशेनं फटका खेळला. मिड ऑफ फिल्ड पोझिशनवरून पळत जात फखर झमान याने चेंडू सीमारेषेबाहेर जाण्यापासून रोखला. पण यावेळी स्नायू दुखापतीनं तो त्रस्त दिसला. त्याने मैदानही सोडले.
पाकिस्तानच्या संघाला आधीच बसलाय फटका, त्यात नव्या भिडूच्या दुखापतीची भीती
पाकिस्तानच्या ताफ्यातील स्टार सॅम अयूब दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून आउट झाला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी सामन्यात हा बॅटरही फिल्डिंग करताना दुखापतग्रस्त झाला होता. या खेळाडूच्या दुखापतीमुळेच फखर झमान याची संघात एन्ट्री झाली आहे. हा अनुभवी खेळाडू पाकिस्तानसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. पण पहिल्या सामन्यातील पहिल्याच षटकात दुखापतीमुळे त्याला बाहेर जावे लागले. ही गोष्ट पाकच्या ताफ्यात टेन्शन निर्माण करणारी आहे.