Champions Trophy 2025, IND vs PAK Match : भारतीय संघानं दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात रंगलेल्या हायहोल्टेज सामन्यात या मैदानात सर्वाधिक सामने खेळण्याच्या अनुभव असलेल्या आणि चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचं यजमानपद भूषवणाऱ्या पाकिस्तान संघाला थोडक्यात आटोपलं आहे. नाणेफेक जिंकल्यावर पाकिस्तान संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याचा हा निर्णय बॅटिंगमधील फ्लॉप शोमुळे चुकीचा ठरल्याचे दिसते. पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तानचा संघ निर्धारित ५० षटकेही खेळू शकला नाही. संघावर ४९.४ षटकात २४१ धावांवर ऑल आउट होण्याची वेळ आली. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २४२ धावांचे आव्हान आहे. पाकिस्तान संघाची बॉलिंग लाइन तगडी असली तरी भारतीय संघासमोर हे आव्हान तोकडेच आहे, असे वाटते. भारतीय संघाने हा सामना जिंकला तर पाकिस्तान संघाला स्पर्धेतून बाहेर होण्याची वेळ येऊ शकते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोहम्मद रिझवान-सौद शकीलची शतकी भागीदारी, पण..
सलामी जोडी स्वस्तात माघारी फिरल्यावर कॅप्टननं सौद शकीलच्या साथीनं शतकी भागीदारी करत संघाला दिलासा दिला. पण ही जोडी फुटली अन् पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला. सौद शकील याने पाकिस्तानकडून सर्वाधिक ६२ धावांची खेळी केली. दुसरीकडे कॅप्टन मोहम्मद रिझवान ४६ धावा करून आउट झाला. ही जोडी फुटल्यावर पाकिस्तानने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. तळाच्या फलंदाजीत खुशदिल शाहनं केलेल्या उपयुक्त ३८ धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघानं २४१ धावांपर्यंत मजल मारली. ४९. ४ षटकातच संघ ऑल आउट झाला.
गोलंदाजीत कुलदीपसह हार्दिकचा जलवा
गोलंदाजीत भारतीय संघाकडून कुलदीप यादव एका क्षणी हॅटट्रिकवर पोहचला होता. त्याला हा डाव साधता आला नसला तरी त्याने या सामन्यात ३ विकेट्स घेत संघाकडून सर्वोच्च कामगिरी नोंदवली. त्याने ९ षटकात ४० धावा खर्च करत या विकेट घेतल्या. हार्दिक पांड्यानेही गोलंदाजीत धमक दाखवली. त्याने ८ षटकात ३१ धावा खर्च करत २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. पहिल्या डावात पंजा मारणाऱ्या मोहम्मद शमीला मात्र या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. त्याने ८ षटकात ४३ धावा खर्च केल्या.
Web Title: ICC Champions Trophy 2025 Pakistan vs India PAK 241 all out Kuldeep Yadav Picks Three Wickets Hardik Pandya Also Take 2 Wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.