Join us

पाकिस्तानात हलकल्लोळ? चाहते स्टेडियमच्या भिंतीवर चढले, सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

Pakistan Security Concern, Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधीच व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे पाकिस्तानातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 20:34 IST

Open in App

Pakistan Security Concern, Champions Trophy 2025 :  चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होण्यास आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. यावेळी ही स्पर्धा पाकिस्तानच्या यजमानपदाखाली 'हायब्रिड मॉडेल' अंतर्गत खेळवली जात आहे. पाकिस्तानमध्ये लाहोर, रावळपिंडी आणि कराची अशा तीन शहरांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत. तर भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवण्यात येणार आहेत. १९ फेब्रुवारी रोजी कराची येथे पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होईल. टीम इंडिया २० फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल. पण स्पर्धा सुरु होण्याआधीच पुन्हा एकदा पाकिस्तानातील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) सध्या त्यांच्या नव्या स्टेडियमची उद्घाटने करत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने याच स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेदरम्यान लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम आणि कराचीतील राष्ट्रीय स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. पीसीबी (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) ने आयसीसीला चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान पाकिस्तानमध्ये खेळणाऱ्या संघांना सुरक्षा प्रदान करण्याचे आश्वासन दिले होते. पण सोशल मीडियावर अनेक क्लिप्स व्हायरल होत आहेत ज्यामुळे पाकिस्तानातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

एका व्हायरल व्हिडिओमध्ये उद्घाटन समारंभासाठी चाहते स्टेडियमच्या भिंतींवर चढताना दिसत आहेत. व्हायरल पोस्टमध्ये दावा केला आहे की स्टेडियमच्या व्हीआयपी विभागात हे सारं घडत आहे. लोकमत या व्हिडीओची पुष्टी करत नाही. तसेच याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंच्या सुरक्षेचे कारण देत टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. हे व्हिडीओ पाहून बीसीसीआयचा तो विचार योग्यच असल्याचे मत चाहते व्यक्त करत आहेत. मात्र हे व्हिडीओ पाकिस्तानातील आहेत की नाही, यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५पाकिस्तानसोशल व्हायरल