Join us
Daily Top 2Weekly Top 5

ICC ला भारताची चिंता; केदार जाधवच्या जागी कोणाची वर्णी, याची उत्सुकता!

...तर केदार जाधवच्या जागी कोणाला संधी मिळायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 09:05 IST

Open in App

कोलकाता, आयपीएल 2019 : अष्टपैलू खेळाडू केदार जाधवला खांद्याच्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागत असल्याची घोषणा चेन्नई सुपर किंग्सने सोमवारी केली. पण ही दुखापत गंभीर स्वरुपाची असेल तर विश्वचषकासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते. केदारची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे समजत आहे. त्यामुळे या दुखापतीतून केदार किती दिवसांमध्ये सावरतो, याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही ( आयसीसी)  केदारच्या दुखापतीची चिंता लागली आहे. केदार यातून सावरला नाही तर त्याच्या जागी कोणाची वर्णी लागेल याचीही उत्सुकता आयसीसीला लागली आहे.

 क्वालिफायर 1 मध्ये आज चेन्नईला मुंबई इंडियन्स या तगड्या प्रतिस्पर्धीचा सामना करावा लागणार आहे. पण या सामन्यात त्यांना अष्टपैलू खेळाडू केदारशिवाय मैदानावर उतरावे लागणार आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात 14 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डीप स्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करताना त्याला ही दुखापत झाली. निकोलस पूरणने टोलावलेला चेंडू अडवण्यासाठी जाधवने डाइव्ह मारली. केदारने चेंडू अडवला, परंतु खांदा दुखावल्याने तो मैदानावर तसाच उभा राहिला. त्यानंतर जाधवने मैदान सोडले. संपूर्ण सामन्यात जाधव नंतर क्षेत्ररक्षणाला आलाच नाही. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर केदारला झालेली दुखापत ही भारतीय संघासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.  

भारतीय संघ व्यवस्थापनाने केदारची दुखापत गंभीर नसावी अशी आशा व्यक्त केली आहे. 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ 22 तारखेला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. दुखापतीमुळे केदारने वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतल्यास निवड समिती अंबाती रायुडू, ऱिषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्यापैकी एकाचा विचार करू शकतात. केदारला वर्ल्ड कपमधून माघार घ्यावी लागल्यास भारतीय संघात कोणाला संधी मिळेल, असा प्रश्न आयसीसीने विचारला आहे. आयसीसीने विचारलेल्या या प्रश्नावर  अनेकांनी अनेक पर्याय सुचवले आहेत. 

भारतीय संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा 

टॅग्स :केदार जाधववर्ल्ड कप २०१९चेन्नई सुपर किंग्स