लंडन : फिरकीपटू आदिल राशिद याला भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी निवडण्यात आल्यानंतर उठलेले वादळ आणि होत असलेली टीका निरर्थक असल्याचे सांगून इंग्लंडचा महान अष्टपैलू खेळाडू इयान बोथम याने राशिदच्या निवडीचे समर्थन केले आहे.
लेग स्पिनर राशिद याला भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने संघात स्थान दिले.
त्याआधी राशिदने आपण वन डे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करीत असल्याचे मीडियात म्हटले होते. २०१८ च्या कौंटी मोसमाआधीच राशिदने लाल चेंडूने क्रिकेट
खेळणे सोडून दिले होते.
सप्टेंबरपासून तो प्रथमश्रेणी सामनाही खेळला नाही.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने निवडकर्त्यांचा निर्णय हास्यास्पद असल्याची टीका करीत कौंटी क्रिकेटसाठी नुकसानदायी असल्याचे संबोधले होते.
दुसरीकडे माजी कर्णधार नासिर हुसेन यानेही राशिदची कसोटीसाठी झालेली निवड कौंटी क्रिकेटच्या हिताची नसल्याचे म्हटले आहे. बोथम याने मात्र या मताशी असहमती दर्शविली आहे. (वृत्तसंस्था)
मायकेलला काय म्हणायचे आहे? माझ्या आकलनापलीकडचे हे वक्तव्य असून निरर्थक बडबड थांबवायला हवी. आदिललादेखील यामुळे त्रास होत आहे. राशिद चांगला खेळ करीत असल्याने तो संघासाठी उपयुक्त योगदान देऊ शकतो.
- इयान बोथम